ब्राह्मणी धर्माच्या सभोंवार बांधलेले जे तीन कोट, पैकी अस्पृश्यता बाहेरचा कोट. - Page 330

२८६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

अस्पृश्यता घालवावयाची आहे, पण सहविवाह सुरू झाल्या खेरीज आपली अस्पृश्यता गेली असें मानावयास ते कदापि तयार होणार नाहींत. ब्राह्मण्य मरेल तेव्हांच अस्पृश्यता जाईल आणि बेटीबंदीचा कोट उडाल्या खेरीज ब्राह्मण्य कांहीं मरत नाहीं. अर्थात ब्राह्मण्य मारल्या खेरीज अस्पृश्य लोक शांत बसणें शक्य नाहीं हें उघड आहे. कारण ब्राह्मण्य आहे तो पर्यंत अस्पृश्यताहि दारांत नसली तरी घरांत राहणारच. या स्पष्टीकरणावरून अस्पृश्यांच्या आकांक्षा काय आहेत हें ब्राह्मणशाहींनें ओळखून घ्यावें. जेथें अस्पृश्यांच्या मागणीची धांव येथवर पोहोचली आहे तेथें या समेटाच्या ठरावाने अस्पृश्य वर्ग ब्राह्मण सभेनें आपणास उपकृत केलें असें न मानतां, ब्राह्मण सभेनें आपली विटंबना केली असेंच मानील. याबद्दल कोणीहि शंका घेऊ नये.

रा. शेट्ये यांना मात्र आपला अपमान झाला असें वाटलें नाहीं हें खरें. उलट ब्राह्मणसभेंनें फारच सौजन्य दाखविलें असेंही त्यांना वाटलें असावें. कारण त्यांच्या मागणींत “हा मेळा शंकरवाडींतील सार्वजनिक गणपतीपुढें माडीवरील दिवाणखान्यांत घ्या व तेथें मुलांना vel म्हणूं द्या, तसें नसेल तर निदान खालील मजल्यावर घ्या, हेंही पसंत नसेल तर खालील चौकांत शंकरवाडीच्या इमारतीसमोर पण भिंतीच्या आंत घ्या. आणि हेंहि पसंत नसेल तर निदान शंकरवाडीसमोर रस्त्यावर मुलें उभीं करा व त्यांची सेवा घ्या” अशी याचना करण्यांत आली होती. अर्थात माझें मागणें तें किती दाता लक्ष्मीचा पति या संतवचनाप्रमाणें ब्राह्मणसभेंनें जो समेटाचा ठराव केला त्यांत रा. शेट्ये यांच्या किमान मागणीपेक्षां कितीतरी मोठा वर देण्यांत आला. श्वानवृत्ती धारण करून केलेल्या मागणींचे AMA साफल्य झालेलें पाहून रा. शेट्ये यांना धन्यता वाटणें, अगदीं साहजिक आहे. परंतु रा. शेट्ये हे अस्पृश्य नाहींत म्हणून त्यांच्या ठायीं अस्पृश्यांत जागृत झालेल्या स्वाभिमानाची ओळखही नाहीं. तसें जर असतें तर त्यांनी आपल्या शाळेंत शिकत असलेल्या मुलांना त्यांच्या हक्कासाठी दैन्य भाकण्यास लाविलें नसतें. रा. शेट्ये यांना आमची अशी सूचना आहे कीं, यावर्षी जसें तुम्ही अस्पृश्य जातींच्या विटंबनेस कारणीभूत झालांत तसें यापुढें तरी होऊं नका. हिंदुधर्मात राहिल्याखेरीज अस्पृश्यांना मोक्ष नाहीं असें जर असतें तर रा. शेट्ये यांच्याप्रमाणे आम्हीहि ब्राह्मण्यग्रस्त लोकांचे पाय धरले असते. पण आम्हाला अजून तशी वेळ आली नाहीं कारण आमच्या सुदैवानें आम्हाला इतर मोक्षाच्या वाटा खुल्या आहेत.

आजकालचे प्रश्‍न : बहिष्कृत भारत, ता. १६ सप्टेंबर १९२७.