समतेच्या झगड्यांत वरच्यास खाली लोटण्याऐवजीं खालच्यास वर ओढणे हाच प्रगतीचा मार्ग. - Page 333

६६
समतेच्या झगड्यांत वरच्यास खाली लोटण्याऐवजीं
खालच्यास वर ओढणे हाच प्रगतीचा मार्ग

अमरावती येथील श्री. अंबेच्या देवळांत जाण्याची परवानगी देता येत नाहीं असें सदरहू देवळाच्या कमेटीकडून लिहून आल्यानंतर तेथील अस्पृश्यांनी या बाबतीत सत्याग्रह करण्याचा ठराव पास केला. परंतु तसें करण्यापूर्वी तडजोडीनें कांहीं साधतें काय हें पाहण्याच्या हेतूनें स्थानिक पुढारी बॅ. बागवे यांनीं एक तडजोडीची योजना तयार केली. त्यांत तीन कलमें होतीं. तीं अशीं (१) अंबेच्या मूर्तीपासून कांहीं अंतरावर एक कठडा बांधण्यांत यावा, व त्या कठड्याच्या आंतील भागांत पुजाऱ्याशिवाय कोणासही जाण्याचा अधिकार असूं नये, (२) दिवसाचा कांही वेळ वगळून इतर वेळेला सर्व हिंदूंना देवदर्शनाची मोकळीक असावी, (३) वर नमूद केलेल्या वेळीं अस्पृश्यांनी देवदर्शनास जाऊ नये. हा तडजोडीचा ठराव पुरता विचार करून केलेला असावा असें दिसत नाहीं. देवळांत प्रवेशः करून अस्पृश्यांना दोन गोष्टी प्रस्थापित करावयाच्या आहेत. त्यांपैकीं पहिली हीं कीं, त्यांच्या प्रवेशानें देवालय भ्रष्ट होत नाहीं. किंवा देवळांतील मूर्तीला स्पर्श केला असतां तिचें पावित्र्य कमी होत नाही. तडजोडीच्या ठरावांतील पहिल्या अटीनें अस्पृश्यांची अपवित्रता साफ धुवून गेली असें म्हणतां येणार नाहीं. जोंपर्यंत देवळाच्या आंत अमुक पावलापुढें अस्पृश्यांनी जातां कामा नये असा निर्बंध राहील तोंपर्यंत अस्पृश्यांतील अपवित्रता कायम आहे असेंच म्हणावें लागेल. पुजाऱ्यानें मूर्तीस स्पर्श केला असतां ती जशी विटाळत नाहीं, तसेंच अस्पृश्यांनीं तिला स्पर्श केला असतां तिचें पावित्र्य भंग होत नाही. अशी स्थिति जेव्हा प्राप्त होईल तेव्हांच धार्मिक व्यवहारांत अस्पृश्य स्पृश्य झाले असें मानतां येईल. आतां या अटीच्या समर्थनार्थ असें म्हणतां येण्यासारखें आहे कीं, पुजारी वर्ग खेरीज करून बाकी सर्व लोकांना स्पृश्यांना तसाच अस्पृश्यांनाही हा निर्बध लागू आहे. तेव्हां यांत वैषम्य वाटण्यासारखें विशेष कांहीं नाहीं. एका दृष्टीनें हें खरेंच आहे. पण आम्हांस असें वाटतें कीं, ठेंगू व लंबू यांच्या उंचितील तफावत काढून टाकून त्यांना एकाच उंचीला आणावयास लंबूची मान उडवणे अशाच प्रकारची समानता प्रस्थापित करण्याचा हा मार्ग दिसतो. अस्पृश्यांना अमुक एका मर्यादेपुढें देवळांत

डब्ल्यू-२०७३-१९ अ