MR/Khand_19 - Page 35

३ एप्रिल १९२७ पासून या बहिष्कृत भारतास सुरुवात झाली. हे बहिष्कृत भारत म्हणजे आंबेडकरी चळवळीचे सर्वार्थाने मुखपत्र होय. बाबासाहेबांच्या विचारांचा दिव्यदाहकपणा या बहिष्कृत भारतामधून मोठ्या मूल्यगर्भपणे अभिव्यक्त होतो. तत्कालीन आजकालच्या प्रश्‍नांपासून ते या वृत्तपत्राला प्रारंभ करतात. बाबासाहेबांच्या कालखंडातील तात्कालिक घटनाप्रसंगांपासून तर नवनवीन तत्त्वसिद्धांतांच्या मांडणीपर्यंतचा महाकाय व्याप हे लेखन तोलून धरते. या लेखनाला विधायक स्वरुपाची तत्त्वशुद्धता आहे. मूकनायकाप्रमाणेच या वृत्तपत्राला ते बिरुदावली देतात. ही बिरुदावली अत्यंत लक्षणीय स्वरुपाची आहे. ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायातील क्र. १८९, १९०, १९१ या तीन ओव्या ते येथे उद्धृत करतात-

“` आता कोदंड घेऊनि हाती | आरुढ पां इथे रथी |

देई आलिंगन वीरवृत्ती | समाधाने ।|

जगी कीर्ति रुढवी | स्वधर्माचा मानु वाढवी |

इया भारा पासोनि सोडवी | मेदिनी हे ||

आता पार्था निःशंकु होई | या संग्रामा चित्त देई |

एथ हे वाचूनि काही बोलो नये || ”'

बाबासाहेबांनी उद्धृत केलेल्या ह्या ओळी विलक्षण अर्थगर्भ आहेत. बाबासाहेबांनी नव्या संघर्षास सिद्ध होऊ पाहणारी मनोवस्था येथे प्रभावीपणे व्यक्त होते. या ओव्या देऊन बाबासाहेब या देशातील तमाम अन्याययग्रस्तांना तसेच स्त्री-शूद्रतिशूद्रांना निकराच्या संघर्षाचा संदेश देतात.

बाबासाहेब आंबेडकरांचे बहिष्कृत भारतातील अग्रलेख तसेच स्फुटलेख परिवर्तनाच्या विचारांनी झपाटलेले आहेत. या खंडामध्ये ३ एप्रिल १९२७ ते २१ डिसेंबर १९२८ या कालखंडातील बहिष्कृत भारतामधील लेख संग्रहित केलेले आहेत. महाड येथील धर्मसंगर व वरिष्ठ हिंदुंची जबाबदारी, महाड येथील धर्मसंगर व इंग्रज सरकारची जबाबदारी, महाड येथील धर्मसंगर व अस्पृश्यवर्गाचे कर्तव्य यासारख्या प्रारंभीच्या लेखांमधून बाबासाहेब येथील महाराष्ट्र भूमीवर निर्माण झालेल्या घर्मसंग्रामाचा अन्वयार्थ विजिगीषु वृत्तीने अभिव्यक्त करतात. यासोबतच अस्पृश्यता निवारणाचा पोरखेळ, दुःखात सुख, आमचे टीकाकार, महार आणि त्यांचे वतन, हिंदुंचे धर्मशास्त्र यासारखे महत्त्वपूर्ण लेख ते लिहितात व त्यातील संघर्षवादी आशयतत्त्व वाचकांच्या मनापर्यंत पोचवितात. बहिष्कृत भारतामधील बाबासाहेबांचे लेखन हे विलक्षण अर्थवाहक स्वरुपाचे आहे. हजारो वर्षांपासून तळा-गाळात पिचत

(सत्तावीस)