धर्मांतर केल्याशिवाय अस्पृश्यांना आपला दर्जा वाढवून घेण्यास वाव नाही - Page 342

६९
धर्मातर केल्याशिवाय अस्पृश्यांना आपला दर्जा
वाढवून घेण्यास वाव नाही

मध्य हिंदुस्थानांत व राजपुतान्यांत मेघवाल नांवाचा अस्पृश्य वर्ग आजवर पितळेचे दागिने वापरीत असे. आतां त्या वर्गातील सुखवस्तु लोकांना पितळेचे दागिने घालण्याची लाज वाटू लागली आहे. आपल्या ऐपती प्रमाणें आपला पोशाख असावा असे वाटणें अगदीं सहाजीक आहे. त्या नियमास अनुसरून या मघवाल लोकांनीं चांदीचे दागिने घालण्याचा प्रघात सुरू केला. खरोखरी सोन्याच्या दागिन्याची हौस चांदीच्या दागिन्यावर भागवून घेणाऱ्या या लोकांची कींव करणेच प्राप्त आहे. परंतु स्थानिक स्पृश्य लोकांना कींव येण्याऐवजी त्यांचा संताप झालेला दिसतो. अस्पृश्य मेघवाल लोकांनीं चांदीचे दागिनें घालणे हां आम्हां स्पृश्य हिंदूंचा उपमर्द आहे असे त्यांचे म्हणणे आहे व त्यामुळें त्यांनीं या मेघवाल जातीचा छळ करण्यास आरंभ केला आहे !! याच अंकांत दुसरीकडे जीं वऱ्हाड प्रांतांतील गृहस्थांचीं दोन पत्रे! छापली आहेत त्यांतील करूण कहाणी अशाच मासल्याची आहे. तेथें ज्या अस्पृश्य लोकांना त्राही त्राही करून सोडलें आहे ते अस्पृश्य लोक स्वच्छतेनें राहतात हाच त्यांचा अपराध असल्याचें दिसते ! मनूनें दरेक वर्णाची राहणी कशी असावी याविषयीं निर्बध घातल्याचे मनुस्मृतींतून आढळून येतें. हे निर्बध इतके अमानुष आहेत कीं ते फक्त दप्तरींच राहत असतील असें म्हणण्याकडे माणसाची प्रवृत्ति होते. परंतु वरील प्रकारचीं उदाहरणें निदर्शनास आली म्हणजे या नियमांची कसून अंमलबजावणी होत असे याची खात्री वाटू लागते. तसे जर नसतें तर असलें प्रकार आज ऐकीवात येतेचना. ब्रिटिशांच्या अमदानींत पिनल कोडांतील गुन्ह्याशिवाय इतर कोणत्याही वर्तनाबद्दल कोणासहि शिक्षा होऊ शकत नाही असा सर्व साधारण

समज आहे. परंतु पिनल कोडांत नसलेल्या गुन्ह्याबद्दल देखील स्पृश्य हिंदु

अस्पृश्यांना कसे छळतात हे वरील उदाहरणावरून उघड होईल.

या बेगुन्हा जुलमांतून अस्पृश्यांची सुटका कशी करून घेता येईल हा अस्पृश्य जनतेपुढे मोठाच प्रश्‍न आहे. या जुलमांतून सुटका करून घेण्यास सरकारची विशेष मदत होईल असें आम्हांस वाटत नाहीं. सरकार हें स्पृश्य हिंदूंच्या ताब्यांत

† पाहा, परिशिष्ट क्रमांक-३१.