वगैरे सांप्रदायाप्रमाणे ब्राह्मण्य हा एक सांप्रदाय आहे - Page 348

३०४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

आपत्कालीं ब्राह्मणेतरांच्या हातचें पाणी पिण्यास तयार झाले आहेत. कमीटीला भालाकारांच्या जरासे पुढें पाऊल टाकण्याचे देखील धैर्य नाहीं काय ?

ब्राह्मण्य कायम राखण्यासाठी ब्राह्मण्यग्रस्त लोक कसे अहर्निश खटपट करीत असतात हें वरील उदाहरणावरून स्पष्ट होत आहें. पण सरकार देखील या कामी त्यांनाच मदत करील असें कोणालाच वाटलें नव्हतें. म्हणून आमचे व्यवसाय बंधु राष्ट्रवीरकर्ते* यांच्यावर बेळगांव येथील डि. म्यॅजिस्ट्रेट यांनीं “ब्राह्मण्य ठार मारलें पाहिजे” असा शब्दप्रयोग इतःपर उपयोगांत आणूं नका अशी नोटीसा बजावल्याचें वाचून आम्हास तरी मोठे आश्चर्य वाटले. कारण इंपीरियलझम्‌, शोशलीझम्‌, बोलशेव्हीझम्‌, क्यापीट्यालिझम्‌ वगैरे सांप्रदायाप्रमाणें ब्राह्मण्य हा एक सांप्रदाय आहे. आणि कोणत्याहि सुधारलेल्या राष्ट्रांत कोणाहि व्यक्तीला कोणता सांप्रदाय बरा, कोणता वाईट, कोणता ठेवला पाहिजे, कोणता काढून टाकला पाहिजे याची चर्चा करण्याचें पूर्ण स्वातंत्र्य असतें व तें या देशांतहि आहे असें आमचें मत आहे. कदाचित ब्राह्मण्य या शब्दाचा अर्थ म्यॅजिस्ट्रेट साहेबांनी ब्राह्मण असा केला असला पाहिजे असा आमचा तर्क आहे. त्याशिवाय असा विचित्र हुकूम त्यांनी सोडला नसता. सांप्रदायाची चर्चा बंद करण्याचा त्यांचा हेतू असता तर त्यांनीं “सत्यशोधक ठार मारलें पाहिजे” असा शब्दप्रयोग उपयोगात आणणाऱ्या बेळगांवच्या परीक्षक पत्राच्या संपादकावरहि इतःपर तसें न लिहिण्याबद्दल मनाई हुकूम काढला असता. परंतु तसें घडल्याचे ऐकिवांत नाही. यावरून आमचा तर्क खरा आहे असें वाटतें. परंतु तो चुकीचा असल्यास ee मॅजिस्ट्रेटच्या ठरावाचा निषेध करणे आम्हास प्राप्त आहे. ाष्ट्रवीर कर्त्यांनी ह्या ठरावाचा वाजवी गैरवाजवीपणा कसाला लावून पहावा. ब्राह्मण्यविध्वंसनास अनुकूल असलेले लोक त्यांना या बाबतीत साहाय्य करतील याबद्दल त्यांनी खात्री बाळगावी.

* शामराव गोविंदराव देसाई.

` † पाहा परिशिष्ट क्रमांक-३२.

आजकालचे प्रश्‍न : बहिष्कृत भारत, ता. ४ नोव्हेंबर १९२७.