MR/Khand_19 - Page 36

पडलेल्या मृत व मूक मनांना जागृत करण्याची अत्युत्कट क्षमता त्यातील प्रत्येक लेखामधून अभिव्यक्त होते. म्हणूनच हे लेख बाबासाहेबांच्या जागृत मनाचा ज्वलजहाल आविष्कार मानावे लागतात.

बाबासाहेब आंबेडकरांचे बहिष्कृत भारतामधून साकार झालेले लेखन हे क्रांतिकारी आशयाचे आहे. हे लेखन वरपांगी सुधारणा अथवा पोकळ डागडुजी करणारे नव्हे. येथील प्रस्थापित समाजरचनेमध्ये मूलगामी परिवर्तन घडवून आणणे, हे या लेखनाचे जीवितध्येय होय. महाड येथे बाबासाहेबांनी जो चवदार तळे मुक्तीचा धर्मसंग्राम उभारला, त्या निमित्ताने ते जनप्रबोधनाची प्रक्रिया दलितवर्गाच्या अंतर्मनापर्यंत नेऊन पोचवितात. अस्पृश्य वर्गाला शेकडो वर्षांपासून गुलाम करणाऱ्या धर्मकल्पनांविरुद्ध ते रान उठवितात. येथील धर्मकल्पनांचा खोटारडेपणा ते शास्त्रशुद्ध चिकित्सेतून सिद्ध करतात. जातीयता, विषमता व अस्पृश्यता निर्माण करणाऱ्या धर्मग्रंथांचा ते खरपूस समाचार घेतात. हा समाचार खरपूस असला तरी तो तितकाच वास्तवदर्शी असतो. अस्पृश्यतेची रुढी कायदेशीर नाही हे स्पष्ट करतानाच ते अस्पृश्यता ही एक स्पृश्य लोकांची लहर आहे हे सप्रमाण सिद्ध करून दाखवितात. पिढीजाद अस्पृश्य वर्ग हिंदुस्थानाशिवाय जगाच्या पाठीवर अन्यत्र कोठेच नसल्याचे ते प्रतिपादन करतात. या अस्पृश्यतेला नष्ट करण्याचे प्रस्थापित धर्मनिष्ठांचे प्रयत्न त्यांना पोरखेळ वाटतात. अस्पृश्य वर्गाची गुलामगिरी वरिष्ठ वर्गाच्या प्रयत्नाने दूर होणार नसून ती अस्पृश्य वर्गाच्याच प्रयत्नाने नष्ट होऊ शकेल, याबद्दल बाबासाहेबांना पूर्ण खात्री आहे. म्हणूनच ते समस्त अस्पृश्य वर्गाला या लेखनाच्या माध्यमातून जागृत व जिवंत करू इच्छितात. प्रस्थापित वर्गातील विचारशून्य लोकांस विचारप्रवृत्त करणे हा या लेखनाचा आनुषंगिक उद्देश आहे. पण या लेखनाचा मध्यवर्ती उद्देश दलितवर्गाला नवी अस्मिता प्राप्त करून देणे, हा होय. नव अस्मितेची निर्मिती ही काही गोडीगुलाबीच्या नाजूकसाजूक शब्दांनी होत नसते. त्याकरिता शब्दांची अस्त्रे बनवावी लागतात. ती शास्त्राप्रमाणे परजावी लागतात. बाबासाहेब बहिष्कृत समाजाला जितेजागते करण्यासाठी शब्दांचे वडवानळ निर्माण करतात व त्याआधारे अग्नीप्रमाणे दाहक असणारे क्रांतिकारी विचार आविष्कृत करतात.

बहिष्कृत भारतातून बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य वर्गाला खितपत ठेवणाऱ्या विविध प्रथा-परंपरांचा सखोल विचार केला आहे. यासंदर्भात त्यांचे महार आणि त्यांचे वतन याबाबतचे विवेचन विशेषत्वाने विचारात घ्यावे लागते. या विषयाबाबतची आपली भूमिका बाबासाहेबांनी येथे सविस्तरपणे मांडली

(अङ्डावीस)