महार वतनाचा कायदा व त्यात सुचविलेल्या दुरुस्त्यांचे स्पष्टीकरण. - Page 350

३०६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

वेसकराची काठी घेऊन वतनाचें सुख दुःख कांहीं अजमावलेले नाही. महारवतनाची अशापरी ओळख नसतांहि महारांचें वतनाशिवाय चालणें शक्य नाहीं व वतन सोडा म्हणून सांगणाऱ्या लोकांपासून महारांनीं सावध राहावें असा अगदीं जिव्हाळ्याचा उपदेश सहजासहजी लाभलेल्या अध्यक्षपदांवरून या दुक्कलीने केला असें म्हणतात. त्याचें आम्हांस नवल वाटत नाहीं. ज्या महारांनीं मोठेपणा भोगला आहे तेच तुम्ही पिढीजात दुसऱ्यांचे नोकर न राहतां अधिकारी व्हा असा उपदेश आपल्या जातभाईस करतील. पण सभेचे अध्यक्ष दोघेही छोटी माणसें. त्यांना मोठेपणाचें स्वप्नहि पडले असेल किंवा नसेल याची शंकाच आहे. अशा छोट्या माणसांनी महारांच्या भाषेंत '' गरीबी अढळ बाच्छाई “ असा उपदेश जो केला तो त्यांना साजेसा नव्हता असें कोण म्हणेल ? या ज्या विरोधक सभा भरल्या, त्यांना आम्ही किंमत न देण्याचें दुसरेही आणखी कारण आहे. आम्ही महारकी वतनाच्या बाबतींत ज्या दुरुस्त्या सुचविल्या आहेत त्या बहिष्कृत भारतांतून जाहीर “करण्यापूर्वी त्यांची चर्चा महार जातींतींल अनेक सुशिक्षित व अशिक्षित लोकांशीं तीन चार वर्षे करीत होतों. नांदगाव व रहिमतपूर या दोन ठिकाणीं महारकी वतनाचा विचार करण्यासाठीं ज्या सभा भरविण्यांत आल्या होत्या त्या सभेंत वरील आमच्या सूचना आम्ही प्रगट केल्या व आमची विशेष अपेक्षा नसताहि त्या ठराव रूपांने दोन्ही सभांतून पसंत करण्यांत आल्या. इतका विचारविनिमय होऊन खुद्द गांवकी करणाऱ्या महार लोकांचें या बाबतींत काय मत आहे, याचा आम्हांस पूर्ण कयास झाल्यानंतरच आम्ही आपली योजना बहिष्कृत भारतांतून प्रसिद्ध केली. अशा परीनें तावून सुलाखून घडविलेल्या योजनेला महार लोकांचा विरोध होईल यास आमची मनोदेवता साक्ष देऊं शकत नाहीं. ज्या महार लोकांनी या सभांतून विरोध व्यक्त केला त्यांना एक तर आमच्या योजनेंचे खरें स्वरूप कळलें नसावें, किंवा सदरहू सभांच्या चालकांनीं तिचा विपर्यास तरी करून दिला असला पाहिजे. परंतु ती पूर्णपणें कळल्यावर ती ज्याला पटणार नाही असा महारच सांपडणार नाहीं असे आम्ही बिनधोक सांगू शकतों.

बहिष्कृत भारत जितक्या साध्या व सोप्या भाषेंत आम्हांस लिहितां येणें शक्‍य आहे तितक्या साध्या सोप्या भाषेंत लिहिण्याचा आम्ही प्रयत्न करीत असतों. तथापि आमच्या अस्पृश्य वाचकांपैकीं बऱ्याच जणांची बहिष्कृत भारत दोनदा वाचूनहि त्यांतील लिखाणाचा आपणास समज पडत नाहीं अशी तक्रार असल्याची आम्ही ऐकून आहोंत. अशा परिस्थितींत आम्ही महारकी वतनासंबंधीं लिहिलेले लेख ज्या वतनदार महारांसाठीं लिहिले ते त्यांना कितपत समजले याबद्दल आम्ही साशंक होतों. तसेंच खासगी द्वेषानें ward चित्त मलीन झालें आहे, असे लोक वतनाविरुद्ध लिहिलेल्या आमच्या लेखांचा फायदा घेऊन वतनास चिकटून

|

| डब्ल्यू-२०७३-२० ब