महार वतनाचा कायदा . . . दुरुस्त्यांचें स्पष्टीकरण ३०७
राहणाऱ्या अडाणी महारांस बिथरवण्याचा प्रयत्न करितींल याचाहि आम्हांस अंदाज होता. परंतु लागोपाठ तीन अंकांत एकाच विषयावर तीन लांबलचक अग्रलेख लिहिले असतांना केवळ कांही महार लोकांना आमची योजना कळली नसेल या सबबीवर पुन्हा तोच विषय चर्चेसाठी घेणें रास्त होणार नाहीं असें वाटल्यावरून तसें करण्याचा विचार एकदां मनांत आला असतांहि तो कृतीत. आणण्याचा नेम आम्हीं केला नव्हता. शिवाय कांहीं खासगी द्वेषाने प्रेरित झालेले लोक संधीचा फायदा घेऊन विरोधांची उभारणी करण्यांत सदा सर्वकाळ दंग झाले असले तरी त्यांनाहि अंतर्यामापासून पसंत असलेल्या योजनेला विरोध करण्याची कुबुद्धि होणार नाही अशी आमची खात्री होती. परंतु विरुद्ध पक्षाच्या अंगी सद्भाव आहे. अशी जी आम्ही आमची समजून करून घेतली होती ती आता खोटी ठरली. कारण
महारकी वतन खालसा करावें म्हणजे इनामातून कमी करून रयताव्यांत
दाखल करावे, व महारांना नोकरीतून सोडवावे
असा आमच्या योजनेचा स्पष्ट हेतू असतांना महारकी वतन खालसा करावे म्हणजे जबरीने काढून घ्यावे असा खोटाच अर्थ करून ते लोकांना सांगत आहेत. तेव्हा ज्या महार लोकांना आमची योजना कळली नसेल त्यांना ती कळावी व विरुद्ध पक्षास या शुभ कार्यात विघ्न करण्यास संधी सापडू नये म्हणून संपविलेला विषय पुन्हा हाती घेऊन आमच्या योजनेचे स्पष्टीकरण करण्याचा आम्ही आज निश्चय केला आहे. महार वतनाच्या कायद्यात ज्या दुरुस्त्या आम्ही सुचविल्या आहेत त्यांत आमचा हेतु काय आहे याचा खुलासा आम्ही प्रथम करीत आहोंत.
आम्ही सुचविलेल्या दुरुस्त्यांच्या मुळाशीं सहा हेतू आहेत (१) पहिला हेतू असा की, जे महार लोक आज गांवकीचे काम करीत आहेत परंतु ज्यांच्या जमिनी परघराण्यात गेल्या असतील त्या त्यांच्या त्यांना परत मिळून त्यांच्या पोटापाण्याची सोय चांगल्या प्रकारे व्हावी.
(२) आज काल महारांना जे बलुते मिळते तें मिळणे न मिळणे सर्वस्वी रयतेचे मर्जीवर अवलंबून ठेवलेले आहे. तेणेंकरून सरकारची व रयतेची कामे करूनहि बलूत्यासाठी महारांना रयतेच्या तोंडाकडे पहावे लागते. दिलें तर घ्यावें, नाहीं तर जावें याशिवाय महारांना बलुतें वसूल करण्यास दुसरा उपाय नाही. ही परिस्थिती जाऊन महारांच्या बलुत्याची वसूली योग्य रीतीनें होऊन त्यांचा बलुत्याचा हक्क पूर्णपणे प्राप्त व्हावा हा आमच्या योजनेच्या मुळाशी असलेल्या हेतूंपैकी दुसरा हेतु आहे.