३०८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
(३) कामाचा बोजा वाढला किंवा महागाई झाली तर कामदार लोकांच्या पगारात वेळोवेळी बढती करण्याचा नियम सर्वत्र लागू आहे. परंतू महारांना द्यावयाचे बलुतें एकदां जे कांहीं ठरून गेलें असेल त्यांत मात्र फेरबदल होत नाही. मग काम कितीहि वाढो अथवा महागाई कितीहि होवो ! तसें न होता महागाईच्या मानाने किंवा कामाच्या बोज्याच्या मानानें महारांच्या बलूत्यांत वेळोवेळीं वाढ व्हावी हा आमच्या योजनेचा तिसरा हेतु आहे.
(४) कांहीं ठिकाणी महार लोक फक्त सरकारी कामें करण्यास तयार असतात. रयतेची कामें करण्यास नाखुष असतात. परंतु रयतेच्या व सरकारच्या कामाची एकच सांगड घातली गेली असल्यामुळे महारांना दोघांचीही कामें करणें भाग पडतें. तसे न होतां ज्या महारांना रयतेचें काम नको असेल त्यांना तीं करण्याचें भाग पडूं नये हा आमच्या योजनेचा चवथा हेतु आहे.
(५) ज्याप्रमाणे कांही महार लोक रयतेच्या कामाला कंटाळले आहेत त्याप्रमाणे कांही महार लोक सरकारी कामाच्या दगदगीला देखील कंटाळलेले आहेत. अशा लोकांना त्यांच्या हितसंबंधास विशेष धोका न होतां त्यांना सरकारी कामाचा राजीनामा देतां यावा हा आम्ही सादर केलेल्या योजनेचा पांचवा हेतु आहे.
` (६) सर्वत्र महार गांवकामगारांची अशी तक्रार आहे कीं महारांचीं कामें निश्चित नाहींत. वाटेल तो अधिकारी वाटेल तीं कामें सांगतो व ती महारांना करणें भाग पडतें. या जुलमाला आळा बसून महार लोकांनी करावयाची कामें निश्चित व्हावी हा आमच्या योजनेचा सहावा हेतू आहे. या उपरनिर्दिष्ट हेतूंना मूर्त स्वरुप देण्याकरितां चालू वतनकायद्यांत ज्या सुधारणा आम्ही सुचविल्या आहेत, त्या येणेंप्रमाणें आहेत. | (१) पहिला हेतू तडीस नेण्यास वतनकायद्याच्या ९ व्या कलमांस एक नवे कलम जोडण्यांत आलें आहे. तें असें- हल्लीं वतनदार गांवकामगारांच्या जमीनी परघराण्यांत गेल्या असतां त्या काढून घेऊन मूळ वतनाच्या मालकास परत देण्याचा अधिकार जरी कलेक्टर यास दिला गेला आहे तरी तो अधिकार अंमलांत आणणें न आणणें हे सर्वस्वी कलेक्टरच्या मर्जीवर राखून ठेवलें आहे. त्यामुळे अधिकार असूनहि कलेक्टर लोक त्याचा उपयोग करीत नाहींत, व केलाच तर जमीन मूळ मालकास देण्याऐवजीं त्याला फार तर कमाल भाडेंच देतात. यामुळे वतनदारांचे कसें नुकसान होतें हें कोणास विशद करून सांगण्याचें कारण नाही. हें नुकसान न व्हावे या हेतूनें परघराण्यांत गेलेल्या जमिनी काढून मूळ मालकास देणें कलेक्टरला भाग पाडण्यांत आलें आहे. ही वतनकायद्यांतील सूचनेपैकीं पहिली सूचना होय. (२) बलुत्याची वसुली योग्य रीतीनें व्हावी असा जो आम्ही मांडलेल्या योजनेचा