महार वतनाचा कायदा व त्यात सुचविलेल्या दुरुस्त्यांचे स्पष्टीकरण. - Page 356

३१२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

व्हा “ असें आज जरी कोणी गोरा अमेरिकन म्हणूं लागला तरी ते लोक आतां जसें गुलामगिरी पत्करणार नाहींत तसेंच कोल्हापूर संस्थांनांतील महारांना “तुमचीं वतनें तुम्हांला देतों, घ्या!” म्हणून कितीही विनवण्या केल्या तरी तें त्याला कदापि कबूल होणार नाहीं. कारण नरकांतल्या किड्यास नरकांतून बाहेर पडण्यापूर्वी आहे तें सोडलें तर आपलें काय होईल अशी त्याला मोठी भिती असते. पण एकदां बाहेर पडला कीं पुन्हा तो नरकवास कधींही पत्करणार नाहीं. तशीच स्थिती आज कोल्हापूर संस्थानांतील महारांची आहे. त्यांची स्थिति वतन गेल्यामुळें इतकी सुधारली आहे कीं, ते “ ताक कण्या चांगल्या” असें म्हणावयास कधींच तयार होणार नाहींत. इतकेच नव्हे तर वतन गेल्याने कोल्हापूर संस्थानांतील महार लोकांचा जो कांहीं फायदा झाला आहे तो पाहून कागल संस्थानच्या महारांच्या तोंडाला पाणी सुटलें आहे व त्यांनी आपलें वतन खालसा व्हावें म्हणून आम्हीं मध्यस्थी करावी या हेतूने आमच्याकडे एक विनंतिवजा अर्ज पाठविला आहे. महारकी वतन खालसा करण्याकरितां जरूर पडल्यास जबरदस्ती करण्यांत यावी असें जरी आमचें मत आहे तरी

वतन कायद्यांत ज्या सुधारणा आम्ही सुचविल्या आहेत त्या अमलांत आणणें

न आणणें हें सर्वस्वी आम्ही महारांच्या मर्जीवर राखून ठेवलें आहे.

त्यांना आवडेल तर त्यांनी कायद्यांत सुचविलेल्या सुधारणा पचनीं पाडून घ्याव्यात. त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची जबरदस्ती नाहीं. महार जातींत वतन बाबतींत जी चळवळ चालली आहे, तिच्यावरून वतनदार महारांचे तीन वर्ग असल्यांचे आम्हांस दिसून आलें आहे. कांहीं महार असें आहेत कीं, ज्यांना चालू वतनपद्धत ठीक आहे असें वाटते. दुसरे असे आहेत कीं, ज्यांना वतन सोडण्याची इच्छा नाहीं, परंतु ज्यांना वतनपद्धतींत सुधारणा होणें इष्ट वाटतें. या दोहोंशिवाय वतनदार महारांचा तिसरा असा एक वर्ग आहे कीं, जो वतनदारीला कंटाळुन गेला आहे व जो जमीन हातची गेली नाहीं तर सारें वतन सोडून देण्यास तयार आहे. आम्ही जी योजना तयार केली आहे, तींत हे तिन्ही वर्ग ध्यानांत धरूनच तयार केली आहे. ज्या महारांना आहे ती वतन व्यवस्था बरी आहे असें वाटतें त्यांना ती सोडून देण्याची जबरदस्ती करण्यांत आलेली नाहीं. त्यांनी आहे त्या परिस्थितींत सुखाने रहावें. ज्यांना वतनांत सुधारणा पाहिजे अशा महारांनी कलेक्टरला अर्ज करून बलुत्याच्याऐवजीं नकद कर ठरवून घ्यावा व तो सरकारला वसूल करण्यास सांगावा. त्याचप्रमाणें रयतेचें काम करणें नको असल्यास अर्ज करून कलेक्टरास तसें कळवावें म्हणजे त्यांना त्यापासून आपली सुटका करून घेतां येईल. परंतु हें महारांच्या मर्जीवर अवलंबून ठेवण्यांत आलें