महार वतनाचा कायदा व त्यात सुचविलेल्या दुरुस्त्यांचे स्पष्टीकरण. - Page 357

महार वतनाचा कायदा . . . दुरस्त्यांचें स्पष्टीकरण ३१३

आहे. त्यांना पसंत पडेल तर त्यांनीं तसें करावे. नको असल्यास त्यांच्यांवर कोणाची सक्ति नाहीं. त्याचप्रमाणें ज्या महारांनां मुळीं वतन नको आहे त्यांनीं शेतसारा भरून मोकळें होण्याची तरतूद करून ठेवण्यांत आली आहे. यांतहि वतन हवें कीं नको हें ठरविणें सर्वस्वी महारांच्या मर्जीवर ठेवण्यांत आलें आहे. ज्यांना पाहिजे असेल, त्यांना सोडा म्हणून त्यांच्या पाठीं कोणी लकडा लावणार नाहीं. ज्यांना नको असेल त्यांना जमीन जाईल या भीतीनें वतनाच्या खोड्यांत अडकून राहण्याचें कांहीं कारण नाहीं. एकूण तिन्ही प्रकारच्या वतनदार महारांची सोय आमच्या योजनेने होणार आहे व तीहि कोणावर जोरजुलूम केल्याशिवाय होणार आहे. अशा योजनेस विरोध करणारे लोक मूर्ख असले पाहिजेत किंवा दुष्ट असले पाहिजेत. दुष्टांचे समाधान करणें अशक्य आहे. आज हें जें स्पष्टीकरण आम्ही करीत आहोंत तें दुष्ट लोकांचे समाधान करण्याकरितां करित नाहीं. फक्त मूर्ख लोकांनीं शहाणे होऊन त्यांच्या लपंडावास बळी पडूं नये येवढ्याच हेतूनें तें करित आहोंत. तो आमचा हेतू

सफल होईल व महार जात वतनाची बेडी तोडून आपल्या उन्नतीचा मार्ग मोकळा

करून घेईल असा आम्हांस पूर्ण भरंवसा आहे.

POC NS

अग्रलेख : बहिष्कृत भारत, ता. ४ नोव्हेंबर १९२७.