MR/Khand_19 - Page 37

आहे. अनेक लेखांतून ते या प्रश्‍नांची सविस्तर चर्चा-चिकित्सा करतात. या वतनातील विविध दोष व विसंगती ते तपशीलवार विशद करतात. ही महार वतन पद्धती म्हणजे अनिर्बंध स्वरुपाची वेठबिगारी व बेबंदशाही होय. हे महार वतन म्हणजे मूर्तिमंत गुलामगिरी होय, याबद्दल बाबासाहेबांना शंका वाटत नाही. काम करावे महारांनी व वतन खावे परक्यांनी ही विपरीत अवस्था ते वाचकांसमोर ठेवतात. या महार वतनामुळे महार गुलामच नव्हे तर स्वाभिमानशून्य व लाचार झाल्याचे ते स्पष्ट करतात. ज्या वतन पद्धतीपासून महार कामगारांचे तसेच महार जातीचे अपरिमित नुकसान झाले आहे, ती महार वतनपद्धती खालसा करणे त्यांना अत्यावश्यक वाटते. यासंदर्भात बाबासाहेब लिहितात, “ वतन म्हणजे महाराच्या दारातील शेवगा आहे. तो कापून काढल्याखेरीज त्यांच्या परिस्थितीत क्रांती घडणार नाही आणि त्यांच्या जीवनक्रमात अशा प्रकारची क्रांती घडल्याशिवाय महार लोक स्वतंत्रपणे उद्योग करून राहण्यास प्रवृत्त होणार नाहीत. वेसकरकी हे महाराच्या महत्त्वाकांक्षेवर मोठे दडपण आहे. वेसकरकी ही आपली अढळ बादशाही, यापेक्षा आपल्याला श्रेष्ठ असा दर्जा तो काय असावयाचा या भावनेने ग्रस्त झालेले महार आई-बाप आपल्या मुलांना वेसकरकीपेक्षा दुसरी उन्नतावस्था प्राप्त करून देण्याचा विचार मुळी आपल्या मनाला शिवूसुद्धा देत नाहीत. वेसकरकीच्या व्यवसायात सापडल्यामुळे कोणीही महार दुसरा पेशा घेण्याची इच्छा करीत नाही.......... म्हणून आम्ही म्हणतो की, खुरटलेला महार समाज वाढीस लागावा हे जर इष्ट असेल तर प्रथमत: महार वतन खालसा झाले पाहिजे.'' वतन गेल्याशिवाय महारांची सुधारणा होणे शक्य नाही, हे बाबासाहेबांना पुरते कळल्यामुळे ते याप्रकारची निर्णायक भूमिका घेतात.

बहिष्कृत भारतातील बाबासाहेबांचे लेखन समाजजीवनाच्या सर्व बाजूंना साक्षेपपूर्वक स्पर्श करणारे आहे. मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या सर्व घटकांचा, घटना-प्रसंगांचा ते सूक्ष्मपणे मागोवा घेतात. हा मागोवा प्रत्येक घटकाच्या, घटकावयवाच्या मूळापर्यंत जाणारा असतो. नामूल लिख्यते किंचित हा त्यांच्या लेखनाचा बाणा आहे. समाजपरिवर्तनाशी संबंधीत असणारा कोणताही विषय त्यांच्या लेखणीला वर्ज्य नाही. जे जे समाजहितकारक व समाजोपयोगी आहे, ते ते विषय बाबासाहेब समर्थपणे हाताळतात. समाजविघातक कल्पनांचे उच्चाटन व समाजहितकारक संकल्पनांचे सर्जन, या दुहेरी पातळीवर त्यांचे लेखन आकारास येते. त्यांच्या लेखनाला प्रगमनशील ध्येयनिष्ठेचा ताठ कणा आहे. या ध्येयनिष्ठेच्या बळावर त्यांचे लेखन आशयतत्त्वानुरुप हवे तसे रूप धारण करीत जाते. अस्पृश्यवर्गाची

(एकोणतीस)