ब्राह्माण्यांच्या टांचेखाली तुडविलेल्या ब्राह्मणेतर लोकांचा ब्राह्मण्याविरूद्ध झगडा करणाऱ्या अस्पृश्यांना विरोध - Page 360

३१६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

असें जाहीर केलें होतें, चालकांचा असा लपंडाव आहे असें सभाजनास कळून आल्यामुळे जेव्हां रा. वामनराव जोशी वकील, यांनीं सभेचे अध्यक्षस्थान बाळंभटजी यांनीं स्वीकारावें अशी सूचना आणली तेव्हां अध्यक्षांची नांवे सुचविणाऱया अशा निराळ्या ७/८ सूचना सभेपुढें आल्या. इतक्या सूचना येण्याचे मुख्य कारण हेंच कीं, जो अध्यक्ष होईल त्यानें दोन्हीं बाजूंचे म्हणणें ऐकून घेण्याचे कबूल केल्याखेरीज अध्यक्षस्थान स्वीकारू नये अशी सभाजनांची ईच्छा होती. पण अशा प्रकारचें आश्वासन देण्यास कोणीच तयार होईना, व सभेस अध्यक्ष मिळेना. अशा परिस्थितींत रा. सदाशिवराव धारप वकील, विरोधाची पर्वा न करतां अध्यक्षाच्या खुर्चीवर जावून बसले. परंतु विरोध झाल्यावर निरूपायानें त्यांना खाली बसावें लागलें. अशा रीतीनें अध्यक्षस्थान कोणीहि स्वीकारीना असें जेव्हां दिसले तेव्हां रा. वामनराव जोशी वकील, यांनीं सांगितलें कीं, ही सभा सत्याग्रहाला विरोध करण्याकरितां बोलाविलेली आहे, ज्यांना विरोध करावयाचा | नसेल त्यांनीं सभा सोडून जावें यावरही मोठ्या कडाक्याचा वादविवाद झाला, व बारा वाजले तरी हरकत नाहीं परंतु सभा सोडून जाऊ नये, अशी सूचना रा." टिपणीस यांनी आणिली, व त्याप्रमाणें सभेतून कोणीही उठून गेले नाहीं. अखेर रा. वामनराव जोशी यांना सभा बरखास्त झाली, असें जाहीर करणें भाग पडले. यावरून एक गोष्ट सिद्ध होते ती ही कीं, महाडची पुष्कळशी जनता अस्पृश्यांना अनुकूल आहे, व लोकमतच पहावयाचे झालें तर जनतेचेंच लोकमत पाहिलें पाहिजे. नुसत्या म्युनिसिपालिटीच्या मतदारांवर ही गोष्ट अवलंबून ठेवतां येत नाहीं, महाड येथील सहा हजार लोकसंख्येच्या वस्तीत म्युनिसिपालिटीचे २१३ मतदार म्हणजे दर्यामें खसखस असेंच म्हटलें पाहिजे.

महाडला बरेंचसें लोकमत आमच्या बाजूचे आहे. हें वरील सभेच्या हकीकतीवरून दिसून येत आहे. आतां जें कांहीं थोडें लोकमत अस्पृश्य लोकांच्या विरूद्ध आहे, त्याला अनुकूल करून घेणे हैं स्पृश्य लोकांतील पुढाऱयांचें आद्य कर्तव्य आहे. हें कर्तव्य ब्राह्मण वर्गाचे पुढारी थोड्या बहुत अंशानें बजावीत आहेत, असें दिसतें. पुण्याचे पुढारी बाबुराव गोखले4 व केसरीचे दुय्यम संपादक रा. ज. स. करंदीकर हे कांहीं दिवसांपूर्वी मुद्दाम पुण्याहून महाड येथे गेले होते. व ता. ३० नोव्हेंबर रोजी त्यांनी महाड येथील नागरिकांची सभा भरवून तेथील लोकांना अस्पृश्यांच्या सत्याग्रहाला विरोध करूं नका, हा हिंदुमहासभेचा संदेश निवेदन केला. त्याचा इष्ट तो परिणाम तेथील ब्राह्मणवर्गावर होईलच,

^ पुणे हिंदू सभेचे एक पुढारी.