आम्हीहि सत्यशोधकींच आहोंत. सत्यशोधकी चळवळ म्हणजे, समानतेची व सदधर्माची चळवळ - Page 362

७४
आम्हीहि सत्यशोधकीच आहोत
सत्यशोधकी चळवळ म्हणजे,
समानतेची व सदृधर्माची चळवळ

१. महाडच्या सत्याग्रह परिषदेची साद्यंत हकिकत* आजच्या अंकांत दुसरीकडे दिली आहे. त्या परिषदे इतकी यशस्वी व परिणामकारक अशी अस्पृश्य वर्गाची परिषद कोठेंच भरली नाहीं, असें आमचें प्रामाणिक मत आहे. तथापि कांहींचा तिच्यावर आक्षेप आहे. त्यांपैकीं एक आक्षेपक पत्र आमचे व्यवसाय बंधु रा. भुस्कुटे, स्वराज्य पत्राचे संपादक, यांजकडून आमचेकडे आलें आहे. त्यांतील आक्षेपांस उत्तर देण्यापूर्वी तें त्यांच्या परवानगीनें जसेंच्या तसेंच आम्ही प्रसिद्ध करीत आहोंत.

“सा. न. वि. वि.--

महाड येथें अस्पृश्यांच्या सभेंत ' मनुस्मृति ' जाळण्यांत आली अशी बातमी आहे. ही बातमी खरी का? अशा कृत्यांनीं काय साधेल, कोणता हक्क अस्पृश्यांना प्राप्त होईल, असें आपल्याला वाटतें ? अस्पृश्य वर्गार आज हजारों वर्षै अन्याय चालू आहेत. या गोष्टीला एकटी मनुस्मृतीच कारणीभूत झालेली आहे काय ? त्या वेळच्या समाजाला नियमांची जरूरी वाटली तसे नियम मनूनें ग्रथित केले. जुने ग्रंथ म्हणजे त्या त्या कालच्या समाजाच्या विचारसरणीचे आदशै होत. समाजाला न पटणारे व अगदी स्वतंत्र असे बुद्धासारखे किंवा खिस्तासारखे किंवा टॉलस्टॉयसारखे महात्मे अत्यंत विरळा. आपल्याला जर आपले हक्क संरक्षण करून घ्यावयाचे असतील तर असलीं निरर्थक व मनें प्रक्षुब्ध करणारीं कृत्यें करण्यांत काय बरें फायदा ? असलीं कृत्यें आपल्या पुरस्कर्तृत्वाखालीं तरी होऊ नयेत अशी माझी इच्छा आहे.

कुलाबा समाचारांत आतांच हकीकत वाचली. कुलाबा समाचारकारांनीं आपल्याला भीमासूर ! ! म्हटलें आहे व सनातन हिंदुधर्म बुडवून एक नवा सबगोलंकारी धर्म स्थापन करण्याची महत्वाकांक्षा आपल्याला आहे असेहि त्यांनीं म्हटलें आहे. महाड येथें झालेल्या आपल्या भाषणाची सर्व नक्कल मला पाठवाल का ? मनुस्मृती जाळल्याचे कुलाबा समाचारातील वृत्त वाचून वाईट वाटतें.

* पाहा, या खंड मालिकेतील खंड १८, भाग-१, पृ. १०२-१४७.