आम्हीहि सत्यशोधकींच आहोंत. सत्यशोधकी चळवळ म्हणजे, समानतेची व सदधर्माची चळवळ - Page 365

आम्हींहि सत्यशोधकीच . . . सदृधर्माची चळवळ ३२१

म्हणजे पाहिली असती, ' असें धमकावणाऱ्या कुलाबा समाचाराच्या संपादकाचा कासोटा फिटला. आणि त्यानें लगेच दुसऱ्या अंकांत मुसलमान समाजाची माफी मागितली. मुसलमान समाजानें रजिस्टर पत्र पाठविण्याच्या ऐवजी तुझा बोल तर माझी बुक्की व तुझी बुक्की तर माझी लाथ असा प्रकार केला नाही हा त्यांचा शहाणपणा होय. पण कुलाबा समाचारांनीं आपली जिभली फाजील चालविली तर आज रजिस्टर पत्रानें काम भागवून घेणारा मुसलमान समाज संपादकाचा पारा उतरण्याकरितां वरील जालीम इलाज करणार नाहीं कशावरून ? आणि जी गोष्ट मुसलमान समाज करील तीच गोष्ट अस्पृश्य समाजास करणें कठीण होणार नाहीं. तेव्हां कुलाबा समाचाराचे संपादकास व त्याच मालिकेतल्या इतर संपादकांस आमचें असे सांगणें आहे कीं, अस्पृश्य समाज हा हल्लींच्या काळीं पेटलेला अग्नि आहे ; त्याच्याशी खेळ खेळूं नका. बीभत्स टीकाकारांना उत्तर न देण्याचें दुसरें कारण असें कीं, त्यांनीं आम्हास वाईट म्हटलें म्हणून आम्ही खरोखरीच वाईट आहोंत असे कांहीं ठरत नाहीं. आम्ही व आमचे वरील टीकाकार या परस्परांमधील भाव जार स्त्री व तिचा पति या परस्परात जो भाव असतो तशाच प्रकारचा आहे. ' जार स्त्रीणां पति: शत्रुः ˆ जार कर्मात रत असलेल्या स्त्रीला आपला नवरा शत्रूसारखा वाटतो. त्याला नित्य शिव्याशापांची ती लाखोली वहाते, त्याचां द्वेष करते आणि रात्रंदिवस त्याचें मरण चिंतिते. तथापि जारीणीच्या जल्पनामुळें, तिचा नवरा दुष्ट आहे असें कोणीहि मानित नाहीं. जुनें तें सोनें मानणारे, अन्यायाला परंपरा म्हणून उराशीं बाळगणारे, माणुसकी गारद करणाऱ्या लिखाणांना धर्मग्रंथ मानणारे, अशा टीकाकारांना मानवी धर्माचें प्रतिपादन करणाऱ्या लोकांच्या दृष्टीनें धर्मक्षेत्रांतील जारिणी अशी उपमा न द्यावी तर कोणती द्यावी ? अशा लोकांनी डॉ. आंबेडकर वेडा आहे असें ठरविण्यांचा प्रयत्न केला म्हणून, तो कांहीं वेडा ठरत नाहीं, किंवा वेडा होत नाहीं. मग हे लोक उपशीत असलेल्या नरकांत दगड टाकून तो अंगावर उडवून घेण्यांत काय हंशील आहे ? शिष्टाचारांचें उल्लंघन न करतांना आम्ही आरंभिलेल्या कार्यांत वादविवाद करण्यास जो कोणी पुढें येईल, त्याच्याशीं वादविवाद करण्यास आम्ही तयार आहोंत. परंतु. पशूबरोबर लागून आम्हांस पशु होण्याची इच्छा नाहीं. येवढ्यामुळेंच इतर टीकाकारांतून उत्तरपक्ष मांडण्याच्या हेतूनें आम्ही स्वराज्याच्या संपादकाच्या टीकेस मानाचा ठाव दिला आहे.

३. वरील पत्रांतील आक्षेप काय आहेत याची छाननी केली असतां, असें दिसून येतें कीं, मनुस्मृति जाळण्यांत आली हा महाडच्या सत्याग्रह परिषदेवरील मोठाच आरोप आहे. वरील आक्षेप जे करतात त्यांनीं एक तर मनुस्मृति वाचली नसावी किंवा मनुस्मृतीत सांगितलेले नियम त्यांना मान्य असावेत. राजकारणांत

डब्ल्यू-२०७३-२१ अ