आम्हीहि सत्यशोधकींच आहोंत. सत्यशोधकी चळवळ म्हणजे, समानतेची व सदधर्माची चळवळ - Page 368

३२४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

घेण्यासाठी, मद्य मांस वर्ज्य केल्याशिवाय त्यांना गत्यंतर नव्हते. कुलाबा जिल्ह्यातील अस्पृश्य लोकांचा करारीपणा स्वार्थ साधण्यासाठीं नाहीं तो स्वार्थावर पाणी सोडण्यासाठीं आहे. हें बापाच्या नांवावर विकणाऱ्या भालाकारानें ध्यानांत घ्यावें हें बरें. परंतु या सुधारणाप्रिय महार लोकांवरही बळहायी लोकांप्रमाणेच प्रसंग गुदरला आहे ! ! जेथें जेथें महार लोकांची वस्ती छोटी आहे व इतर स्पृश्य लोकांची वस्ती मोठी आहे, तेथें तेथें महार लोकांना तुम्ही मेलेल्या जनावरांचे मांस खाल्लेंच पाहिजे, गावांत भाकरी मागितलीच पाहिजे, सर्वांना जोहार घातलाच पाहिजे, अशी सक्ति करण्यांत येत आहे. आमच्या स्वराज्य पत्राच्या संपादकांस आम्ही असें विचारतों कीं, वरील उदाहरणें काय दर्शवितात ? आमच्या मतें तीं जें दर्शवितात तें हेंच कीं, मनुस्मृति ही जुनी जंत्री नसून चालू वहिवाटींत आहे. मनुस्मृतीत सांगितलें आहे कीं, शूद्र लोकांनीं अमंगल राहावें, भिक्षा मागावी, धन संचय करूं नये, व मेलेलीं जनावरें न्यावींत. स्पृश्य लोक जे आज अस्पृश्य लोकांना आपली सुधारणा करूं देत नाहींत त्याचें कारण असें कीं, त्यांनीं जर सुधारणा केली तर मनूनें घालून दिलेल्या पायऱ्या राहूं शकत नाहींत. तसें जर नसतें तर सुधारणाप्रिय अस्पृश्य लोकांवर असा जुलूम कां करण्यांत येता ? अस्पृश्य लोक स्वच्छतेनें राहिले, भाकरी मागण्यासारखें हीनपण त्यांनी सोडलें, मृत मांसाहाराचें त्यांनीं उच्चाटण केलें तर त्यांत स्पृश्य वर्गाचे काय नुकसान होण्यासारखें आहे ? कांहींच नाहीं. केवळ अस्पृश्य लोकांनीं पायरी सोडूं नये म्हणून हा सारा जुलूम चालला आहे. यावरून कोणाहि हिंदुमात्रास तेव्हांच कळेल कीं स्पृश्य लोक अस्पृश्य लोकांस सुधारणा करूं देत नाहींत. ते मनुस्मृतीचे नियम पाळीत आहेत. दुसरें कांहीं करीत नाहींत. असें असतांना मनुस्मृति ही जुनी जंत्री आहे हे म्हणणें केवढें धाडसाचें आहे याचा आमच्या मित्रांनी विचार करावा.

५. ज्यांना आमचा हा युक्तिवाद पटत नाहीं त्यांना आम्हीं असें विचारतों कीं मनुस्मृति हें जर जुनें बाड आहे तर तें जाळल्यानें तुमचें काय बिघडलें ? वाण्याच्या घरी पुड्या बांधण्यासाठी पडलेली रद्दी जर कोणी जाळली तर त्याबद्दल कोणाचाच

जळफळाट होत नाहीं. मग मनुस्मृति ही एक रद्दी पोथी आहे असें म्हणणाऱ्या

लोकांनीं तिची होळी केल्याबद्दल एवढे आकाशपाताळ एक करण्यांत यावे हैं आश्‍चर्यकारक नव्हे काय ? ज्याअर्थी या लोकांचा असा जळफळाट झाला आहे त्याअर्थी ती पोथी रद्दी नाहीं, तिला लोक मानतात ही गोष्ट सिद्ध आहे. मग जी पोथी लोकांस मान्य आहे व जी आम्हांस मान्य नाहीं अशा पोथीची आम्ही कां होळी करूं नये ? यावर आमचें मित्र असें म्हणतात कीं, मनुस्मृति जाळून काय