आम्हीहि सत्यशोधकींच आहोंत. सत्यशोधकी चळवळ म्हणजे, समानतेची व सदधर्माची चळवळ - Page 370

३२६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

विरोधी आहेत की एकाच तोंडानें या दोन्ही गोष्टींचा उच्चार करणाऱ्या लोकांच्या प्रामाणिकपणाची आम्हांस जबरदस्त शंका येते. आणि म्हणूनच अशा लोकांच्या सहानुभूतीची आम्ही विशेष दरकार करीत नाही. यावरून आम्हांस कांहीं मूर्ख लोक असें दूषण देतात कीं, आम्ही साऱ्याच स्पृश्यलोकांवर एकजात तुटून पडत आहोंत. व तेणेकरून अस्पृश्यता निवारणाचे कार्य दुष्कर करीत आहोंत. पण हा त्यांचा गैरसमज आहे. तशी जर आमची भावना असती तर आमचे मित्र रा. अनंतराव चित्रे, गंगाधरराव सहस्त्रबुद्धे व रा. देवराव नाईक, मोर्शचि मुंडले व अमृतकर यांना आम्ही शिरसावंद्य मानले नसते. किंवा अस्पृश्येतर लोकांना सत्याग्रहांत भाग घेऊ दिला नसता. आम्हांला स्पृश्य लोकांची सहानुभूति मिळेल तितकी थोडीच आहे. मात्र खरें सहानुभूतीचें कोण हें कसाला लावून पाहिल्याखेरीज नुसती सहानुभूतीची साखर पेरणाऱ्या लोकांना आम्ही आपले मित्र म्हणण्याचा बावळटपणा करीत नाहीं, अगर त्यांना भिऊन आमचा निषेध व्यक्त करण्यास आम्ही मागें घेत नाहीं. यात आमची चूक होत आहे असें कोणी म्हणेल असें आम्हांस वाटत नाहीं.

६. कलेक्टरच्या सांगण्यावरून सत्याग्रह थांबविण्यांत आला हा महाडच्या परिषदेवर आमच्या मित्राचा दुसरा आरोप आहे. आमच्या टीकाकारांच्या भाषेंत. सांगावयाचें म्हणजे “महाडचा सत्याग्रह म्हणजे कलेक्टरचा खेळ असें झालें." आमच्या या टीकाकारांच्या म्हणण्यांत अर्थ असो किंवा नसो, आम्ही कलेक्टरला भिऊन सत्याग्रह थांबविला असें नाशिकच्या स्वातंत्र्यकाराप्रमाणे ते म्हणत नाहींत, हें पाहून आम्हास एक प्रकारचा आनंद वाटतो. भ्याडपणानें सत्याग्रह केला नाहीं असा आमच्या वर आरोप करण्याचा जर कोणास अधिकार असेल तर तो एखाद्या सत्याग्रही वीरालाच असूं शकेल. ज्याला आजवर सत्याग्रह करण्याचा-नव्हे, सत्याग्रह करण्याचा विचार करण्याचा-प्रसंग आलेला नाहीं, ब्राह्म जातींत जन्मल्यामुळे अष्टाधिकारांचें गांठोडें जन्मतःच हातीं आले असल्याने ज्याला समाजाच्या विरूद्ध सत्याग्रह करण्याचा प्रसंग येण्याचा कधी संभव नाहीं, व परार्थसाधनासाठी आपल्या गणगोत्रांविरूद्ध सत्याग्रह करण्याचे ज्यास शील नाही; एकूण सारें आयुष्य स्वतःचें उदर भरण्याकडे खर्ची घालण्याशिवाय दुसरें उज्वल ध्येय नाहीं, अशा स्वातंत्र्याच्या संपादकानें वीराचा उसना आवेश आणून कलेक्टरला भिऊन सत्याग्रह थांबविला, असे उद्गार काढणें हास्यास्पद नव्हें काय ? आधीं कर आणि मग बोल, असा ज्याचा नियम असेल त्यानेच दुसऱ्याला हिणविण्याच्या भानगडीत पडावें, उत्तराला ठपका देण्याचा अधिकार अर्जुनाचा आहे. तो स्वातंत्र्याच्या संपादकासारख्या बृहन्रडेचा नाही. असो |