आम्हीहि सत्यशोधकींच आहोंत. सत्यशोधकी चळवळ म्हणजे, समानतेची व सदधर्माची चळवळ - Page 371

आम्हीहि सत्यशोधकीच . . . सदृधर्माची चळवळ ३२७

स्त्री दाक्षिण्याच्या नियमानुसार अबलेचे कठोर शब्द सोसणे हा देखील शिष्टाचारच आहे. तथापि पुष्कळशा लोकांचा असा समज झाला आहे की, कलेक्टरचा मनाई हुकूम मोडण्याची आमची छाती झाली नाहीं, म्हणून सत्याग्रह थांबविण्यांत आला. पण या लोकांना आम्ही असें wad इच्छितो की, कलेक्टरनें मनाई हुकूम काढला होता. ही हकीगतच मुळीं चुकीची आहे. कलेक्टर साहेबांनें मुळी मनाई हुकूम काढलाच नव्हता. तेव्हां कलेक्टरच्या हुकुमास आम्ही भ्यालो असें जे म्हणतात, त्यांचे म्हणणें सर्वथा अर्थशून्य आहे यांत शंका नाही. कलेक्टर साहेबांनी दंडाची भाषा मुळीं केलीच नाहीं. त्यांचा सारा भर सामदामावरच होता. तेव्हा आमच्यावर जर कोणता आरोप असूं शकेल तर आम्ही कलेक्टरचें म्हणणें ऐकलें हें बरे केलें किंवा वाईट केलें एवढ्यापुरताच असू शकेल.

७. आम्ही कलेक्टरचें ऐकिलें तें योग्य केलें असें आमचें प्रामाणिक मत आहे व तसे मत होण्यास कांहीं कारणेंही घडलीं. त्यापैकी जे कारण खरोखरी निर्णायक ठरलें त्याचा आम्ही जसा विचार केला तसा आमच्यावर आरोप करणाऱ्यांनीही केला आहे असें वाटत नाहीं. सत्याग्रह करण्यास महाड मुक्कामी जे १० हजार अस्पृश्य लोक जमा झाले होते त्यांच्या वाटेंत किती कांटे पसरलेले आहेत व ते कोणी पसरलेले आहेत याची कल्पना या लोकांना तशीच ती आम्हालाही होती. सत्याग्रहाची मोहीम सुरू झाल्यापासून कुलाबा जिल्ह्यांतील व रत्नागिरी जिल्ह्यांतील उत्तर भागांतील अस्पृश्य लोकांवर स्पृश्य लोकांचा जो जुलूम चाललेला आहे त्याचें यथार्थ वर्णन करतां येणें आम्हास अशक्य आहे. सत्याग्रहांत कोण भाग घेणार याचीं नांवें नोंदण्यासाठी जशीं माणसें बसविण्यात आली होती तसेंच गांवगांवच्या लोकांच्या तक्रारीची नोंद करून घेण्यासाठीही बसविण्यात आली होती. या तक्रारींच्या नोंदपत्रकांचा भारा चाळून पाहिला तों असें दिसून आलें कीं, असा एकही गांव नाहीं कीं जेथे गरीब बिचाऱ्या अस्पृश्यांवर, ते केवळ आपली उन्नति करून घेत आहेत एवढ्याच कारणामुळे त्यांच्यावर जुलूम झालेला नाहीं. सत्याग्रह केल्यानें होणारा जोरजुलूम द्विगुणित होणार याबद्दल कोणाच्या मनांत शंका नव्हती. परंतु सरकार आमचें संरक्षण करील या भरंवशावर या छळणुकीची आम्ही मुळीच तमा केली नव्हती. सरकारची मदत आहे तोंपर्यंत स्पृश्य लोकांच्या जांचणुकीचें भय बाळगण्याचे आम्हास कारण नव्हतें. परंतु कलेक्टरनें उलट खाल्ल्यामुळे अस्पृश्य जनतेस स्पृश्य जनतेच्या जुलूमापासून बचावण्यास अवश्य असणारें सरकारी संरक्षण पूर्णपणें मिळेल किंवा नाहीं याबद्दल साहजिकपर्णे शंका उत्पन्न झाली.