आम्हीहि सत्यशोधकींच आहोंत. सत्यशोधकी चळवळ म्हणजे, समानतेची व सदधर्माची चळवळ - Page 372

३२८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

८. ही शंका बलवतर होण्यास दुसराहि एक विचार कारणीभूत झाला. सत्याग्रह करावयाचा तो दुराग्रहाविरूद्ध करावयाचा. अर्थात कलेक्टरचें म्हणणें धुडकावून सत्याग्रह करण्यापूर्वी कलेक्टरचा दुराग्रह आहे, याची खात्री करून घेणे प्राप्त होते. सरकार झालें म्हणून त्याच्याविरूद्ध सत्याग्रह करताना कसलाच विचार करूं नये अशा अर्थाचे जे आमच्या मित्राचे म्हणणे आहे तें आम्हास मुळीच पटत नाहीं. नव्हे ते कोणाही सत्याग्रही माणसास पटणार नाहीं. ज्याला ज्याला म्हणून या प्रकरणाची पूर्ण माहिती आहे त्याला त्याला कलेक्टरचा दूराग्रह नव्हता असेंच म्हणावे लागेल. कोर्टात प्रकरण जाण्यापूर्वी आपण अस्पृश्य लोकांस तळ्यावर जाण्यास हरकत करणार नाहीं, उलट तुम्ही जर त्यांना हरकत कराल तर तुमचा मी बंदोबस्त करीन, असें महाडच्या स्पृश्य लोकांस कलेक्टरनें बजाविलें होतें. शिवाय भरसभेंत येऊन आपण तुमच्याविरूद्ध नाहीं, अशी त्यांनी अस्पृश्य लोकांपुढे कबुली दिली. इतकेंच नव्हे तर, हें तळें सोडून इतर कोणत्याही सार्वजनिक तळ्यावर सत्याग्रह करा, आपण मदत करावयास तयार आहोंत, असेहीं त्यांनीं स्पष्ट करून सांगितलें. अशा विचाराच्या कलेक्टरांत दुराग्रह आहे, असें कोणी विचारी माणूस म्हणूं शकेल असें आम्हांस वाटत नाहीं. असें असतांना त्यांच्या म्हणण्याविरूद्ध सत्याग्रह केला तर स्पृश्य लोकांच्या जुलुमापासून दाद मागते समयी माझा दुराग्रह नसतां. तुम्ही सत्याग्रह केलात मग केलें तसें भरा, असें म्हणण्यास कलेक्टरला कारण सांपडलें असतें. दुसरें असें कीं सरकारविरूद्ध सत्याग्रह केल्यानें सरकार अस्पृश्यांच्या न्याय्य हक्कांविरूद्ध आहे, असा एक नसता आरोप सरकारवर लादण्यात आला असता. आम्ही नसताच म्हणतों याचें कारण सरकार अस्पृश्यांच्या न्याय्य हक्कांच्या विरूद्ध नाहीं, अशी कलेक्टरांनी दिलेली कबुली, हे होय. अर्थात्‌ सरकारचा अपराध नसतांना त्यास विनाकारण बदनाम केल्यामुळें त्यास चिडविल्यासारखे झालें असतें. इष्ट असलेली गोष्ट करीत नसतांना ठपका दिला तर माणूस लाजतो. पण ती करीत असतांना ठपका दिला तर त्याच माणसाला आपल्याला विनाकारण कलंक लावल्यामुळे त्वेष येतो व बरें करण्याऐवजी तो घात करण्यास प्रवृत्त होतो हा मानसशास्त्राचा अनुभव आहे. अस्पृश्य समाज हा सरकार आणि स्पृश्य वर्ग या दोन्ही दळांच्या तावडींत सापडलेला वर्ग आहे. त्याला दोहोंपैकी कोणत्या तरी एका दळावर मारा करणें शक्‍य आहे. दोन्ही दळांवर एकाच वेळी मारा करण्याइतके बळ त्याच्यांत आज नाहीं हें कबूल करण्यांत कांहीं लाज नाहीं. जेथें स्पृश्य जनता, त्यांचे मानवी हक्क स्वखुशीनें व सलोख्यानें देत नाहीं तेथे ते मिळविण्याकरिता सरकारशी तहनामा करणे हेंच अस्पृश्य लोकांच्या हिताच्या दृष्टीनें शहाणपणाचे आहे, असें आम्हास वाटले.