330 डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
अत्याचाराचा अवलंब करून करतां येईल त्याचा विचार करणें भाग पडलें.
संरक्षण करतां येण्यासारखें आहे. पण तो मार्ग पत्करावयाची इच्छा आम्हांस नाहीं. आज तरी आमच्या लोकांचे संरक्षण सनदशीर मार्गानेंच आम्हास साधावयाचें आहे. व त्या करितांच कलेक्टरची मर्जी राखण्याच्या भरीस आम्ही
पडलों.
qo. कलेक्टरची मर्जी राखली पण लोकांची निराशा करून, त्यांच्या तेजोभंगास कारणीभूत झालांत असाही कांहीं जणांचा आरोप आहे. अशा रीतीने जो जोम आज लोकांत उत्पन्न झाला होता तो पुढे टिकेल काय अशी पुष्कळांना शंका येते. हें त्यांचें म्हणणें कांही अंशी खरें असूं शकेल. पण तें सर्वस्वी खरें असूं शकणार नाहीं. सूर्यास्त झाल्यावर संधिकाल येतो तसेच सत्याग्रह थांबल्यामुळे लोकांचा हुरुप ओसरेल हें खरेंच. तथापि सूर्यास्तापाठी संधिकाल झाला म्हणून पुन्हां केव्हांच सूर्योदय होणार नाही, हें म्हणणें जसें चुकीचे आहे तसेंच आजचा जोम ओसरला म्हणून, त्याचा संचार पुन्हा कधींच व्हावयाचा नाहीं हैं म्हणणेहि चुकीचें आहे. शिवाय उत्साह-निरुत्साह यांच्या बाबतींत एक गोष्ट ध्यानात घ्यावयास पाहिजे होती ती ही कीं, ज्याच्यावर प्रसंग नाहीं तो मनुष्य मृतप्राय असतो. कठीण योग आल्याशिवाय माणसाच्या आंगांत चैतन्य उत्पन्न होत नाही. तथापि योगांचे काठिण्य, त्याची दुर्घरता पल्ल्याचे बाहेर गेली म्हणजे देखील माणूस पुनः मृतप्राय होतो. व ती गोष्ट आपणांस असाध्य आहे म्हणून तिचा नाद सोडून निराश होऊन प्रयत्न करण्याचें सोडून देऊन बसतो. सत्याग्रहाची ही जी चळवळ आरंभिलेली होती ती केवळ चवदार तळें काबीज करण्यापूरती आरंभिलेली नव्हती. तर अस्पृश्य लोकांना आपल्यापुढें ठेविलेलें ध्येय पदरांत पडेतोंपर्यंत ती कायम टिकावी या हेतूने ती उभारण्यात आली होती. ती कायम टिकेल किंवा नाही हें सत्याग्रहापासून होणारा जुलूम किती मोठा होईल व त्यापासून लोकांचा बचाव करण्याची साधनें आहेत किंवा नाहींत यावरच अवलंबून राहणार. महाडचा एक सत्याग्रह लोकांनीं केला असता; पण त्यापासून होणाऱ्या त्रासांतून आपला बचाव होऊं शकत नाहीं, हें जर लोकांना कळलें असतें तर त्यापुढें होणाऱ्या दुसऱया कोणत्याहि सत्याग्रहांत भाग घेण्यास ते तयार झाले असते किंवा नाहीं याचा विचार करणे अवश्य आहे. विचारांती ती शंका खरी होण्याचा पुष्कळसा संभव वाटल्यामुळे, अनेक सत्याग्रह करण्याइतका जोम कायम टिकावा म्हणून महाडचा सत्याग्रह तहकूब करणे भाग झाले. आतां कांहीं लोक असें म्हणतील कीं, हें सर्व भविष्य जर तुम्हांस दिसत होतें तर तुम्ही महाडला गेलातच कशाला ? याला आमचें उत्तर असें आहे कीं,