आम्हीहि सत्यशोधकींच आहोंत. सत्यशोधकी चळवळ म्हणजे, समानतेची व सदधर्माची चळवळ - Page 376

३३२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

विचार आमच्या मित्रांनी जितका करावयास पाहिजे होता तितका केला नाही असे आम्हास म्हणावें लागते. सत्यशोधकी चळवळीला अशा प्रकारचें अनिष्ट वळण लागल्याचें मुख्य कारण म्हटलें म्हणजे ब्राह्मण जातीचा त्या चळवळीस होणारा एकजात विरोध हेंच होय. ब्राह्मण जातींतील कांहीं लोकांनी तरी सत्यशोधकी चळवळीनें आपल्यापुढें मांडलेली समानतेची व सद्धर्माची तत्वें मान्य केली असती तर सत्यशोधकी चळवळीस ब्राह्मण द्वेषाचे भूत लागलें नसतें. किंवा तिच्या प्रसारार्थ तिला सरकारची कांसहि धरावी लागली नसती. अशी परिस्थिति असल्याकारणानें आमच्या मित्रांस आमची अशी सूचना आहे की, त्यांनी सत्यशोधक व्हावें आणि आपल्या जातभाईसहि सत्यशोधक बनविण्याचा प्रयत्न करावा.

आजकालचे प्रश्‍न : बहिष्कृत भारत, ता. ३ फेब्रुवारी १९२८.