के. श्रीधर बळवंत टिळक - Page 392

३४८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

सभेचे काम फार उत्साहाने चालले होते. हिंदु महासभेच्या कामापेक्षा समाज समता संघाचा कार्यक्रम कसा परिणामकारक आहे या आशयाचे थोडेसे कडाक्याचे भाषण संपवून नुकताच मी खाली बसलो होतो. इतक्यात एक तार आली. तार येण्याचे काही कारण नसताना तार आली यामुळेच मला थोडा धक्का बसला. वाचून पाहातो तो ज्या समता संघाच्या कार्याची महती गाऊन मी खाली बसलो होतो त्याच समता संघाच्या पुणे येथील शाखेचे उपाध्यक्ष माझे मित्र रा. श्रीधर बळवंत टिळक वारले म्हणून बातमी. मी अगदी गांगरून गेलो. आधी हे खरेच वाटेना. परंतु ही तार संघाच्या सेक्रेटरीने केली असल्यामुळे ती खोटी म्हणता येईना. अशा परिस्थितीत एक दुखवट्याचा ठराव मांडून मी सभा सोडून तसाच तडक मुंबईस आलो. गाडीत श्रीधरपंतांच्या मरणासंबंधी अनेक तर्क माझ्या मनात आले व आपण आरंभिलेल्या कार्यातील धडाडीचा एक मोठा जोडीदार नाहीसा झाला हे जाणून माझे मन फार उद्विग्न झाले. श्रीधरपंतांना कोणी तरी दुष्टाने विषप्रयोग केला असावा असा माझा प्रबल तर्क झाला. तारेत मरणाचे कारण काहीच दिलेले नव्हते. तेव्हा मरणाचे कारण हेच की दुसरे कोणते, हे जाणण्यासाठी गाडी मुंबईस केव्हा पोहोचेल असे मला झाले होते. गाडी दादरला पोहोचल्याबरोबर मी माझ्या ऑफिसात गेलो. टाईम्स्‌ हातात घेतो तोच श्रीधरपंतांचे हातचे मरणापूर्वी तीन तास अगोदर मला लिहिलेले एक पत्र टेबलावर पडलेले दिसले. तेव्हा टाईम्स्‌ टाकून ते हाती घेतले. वाचतो तो आत्महत्त्या हेच मरणाचे कारण होय हे अगदी स्पष्ट झाले.

मग तर अगदी कष्टी झालो. श्रीधरपंताला मी थोडासा दोषही दिला. आत्महत्त्या हा मरणाचा एक भेसूर प्रकार आहे. परंतु ज्या कारणामुळे ही आत्महत्त्या घडली ती कारणे ध्यानात घेतली म्हणजे श्रीधरपंतांची आत्महत्त्या मोठी हृदयद्रावक होती असे म्हणणे भाग पडते. आपले आयुष्य केसरी कपुशी भांडण्यात जाणार, आपल्याला विधायक काम करण्यास अवसर राहाणार नाही. यास्तव जगण्यात हाशील नसून आत्महत्त्या करणे बरे, असे म्हणण्याची पाळी श्रीधरपंतांवर यावी, यासारखी अनिष्ट गोष्ट ती कोणती ? माझ्या मते श्रीधरपंतांना केसरीत जागा मिळाली असती तर हा घोर प्रसंग आलाच नसता. केसरी पत्रात आपणास जागा मिळावी ही एक त्यांची महत्वाकांक्षा होती. टिळकांच्या मरणानंतर ज्यांच्या हाती केसरी गेला त्यांनी केवळ टिळकांचा मुलगा म्हणून श्रीधरपंतांना त्यांच्या वडिलांनी केलेल्या उपकारांची फेड या दृष्टीने केसरीच्या चालकांत जागा द्यावयास पाहिजे होती. परंतु टिळकांचा मुलगा म्हणूनच नव्हे तर भारदस्त लेखक या दृष्टीने केसरीच्या संपादक वर्गांत