आजवरि होतों तुझे सत्तेखाली | तोवरि तों केली विटंबना - Page 398

३५४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

स्पृश्य हिंदूनी आमच्यासाठी काय केले ?

असा एखादा प्रश्‍न अस्पृश्यांनी विचारला की, नाना तऱ्हेच्या कोट्या लढवून कांही सूज्ञ म्हणविणारे हिंदू लोक त्यांना निरुत्तर करण्याचा प्रयत्न करतात. . कोणी म्हणतो, आम्ही आमच्या बायकांची सुधारणा करण्यात गुंतलों आहोंत, जरा दम धरा ; आमच्या बायका सुधारल्या म्हणजे मग त्यांच्या सहाय्यानें आम्ही तुमचा प्रश्‍न हाती घेऊं. यांच्या बायका कांही सुधारत नाहींत, आमचा प्रश्‍न ते कांही हातीं घेत नाहीत आणि ज्या सुधारल्या आहेत त्या अस्पृश्यतानिवारणास कांही अनुकूल नाहींत, हें पुण्याच्या सेवासदनांतील अंतर्व्यवस्थेंवरून दिसत आहे. एकूण आमचा प्रश्‍न लोंबत ठेवण्यास बायकांची बरी सबब झाली. दुसरा म्हणतो, प्रार्थना समाजाने अस्पृश्यांसाठी शाळा नाहींत कां काढल्या ! प्रार्थना समाजाने अस्पृश्यांसाठी काढलेल्या शाळेतून शिकून किती विद्यार्थी तयार झाले हे कांही आम्हांस नक्की माहीत नाही. पण या शाळा आतां बहुतेक बंद झाल्या हें खरे. याच प्रार्थनासमाजानें मात्र सासच्याशी, दिराशीं अगर पुतण्याशीं व्यभिचार करून पोट वाढविलेल्या स्पृश्य हिंदुच्या बोडक्या बायांचे बाळंतपण सुखाने पार पडावें म्हणून एक अनाथाश्रम हजारो खस्ता खावून कर्जाला न जुमानतां चालूं ठेविला आहे. ह्या एकाच गोष्टीवरून प्रार्थनासमाजाला अस्पृश्यांविषयी कळकळ जास्त आहे किंवा बोडक्या बायांच्या बाळ॑ंतपणांची कळकळ जास्त आहे, हें दिसून येईल. तिसरा म्हणतो, १९२३ सालीं आम्ही स्पृश्यांनी अस्पृश्यांशी सहभोजन केले ! मोठी बहाद्दरी केली ! खानावळवजा हॉलमध्ये १९२३ साली सहभोजन झाले, या एका गोष्टीवरुन अस्पृश्यता काढून टाकण्यास लोक तयार झाले आहेत असें जो म्हणतो तो अगदी भोळा असला पाहिजे किंवा लुच्चा असला पाहिजे. त्याला आम्ही असें सुचवितों कीं, पशू, पक्षी जसे एका गोठणीवर एकत्र बसून चारा खातात तसें एका निर्जन व निर्लेप जागेंत कांही स्पृश्य, कांही अस्पृश्य, एका आकाशाखाली जमले असतील व जेवले असतील ! त्यांत मोठेसे काय घडले ? घराबाहेर इराण्याच्या दुकानांत सर्वच लोक एकत्र जेवतात. पण इराण्याच्या दुकानांत महार व ब्राह्मण एका टेबलावर जेवतात म्हणून ब्राह्मण महाराचा विटाळ पाळीत नाहीं हे म्हणणे जितके हास्यास्पद आहे तितकेंच वडाच्या झाडाखाली दोन्ही जातीतील कांही भूतांनी एकत्र बसून भाताची शिते खाल्ल्यामुळे अस्पृश्यता गेली हे म्हणणे हास्यास्पद आहे. नाहीतर एकाच मुंबईत १९२३ सालीं सहभोजनास तयार झालेला हिंदू समाज १९२८ सालीं एकत्र पाणी पिण्याचा प्रसंग आला असतांना ' धर्म बुडाला ! धर्म बुडाला !' अशी ओरड करू लागला

डब्ल्यू-२०७३-२३ ब