आजवरि होतों तुझे . . . केली विटंबना ३५५
नसता. वरील प्रकारची बकालीं सहभोजने म्हणजे एक प्रकारचें तमाशे होत. अशा एखाद्या सहभोजनाचा अस्पृश्यतानिवारणास हवाला देऊन शहाण्या हिंदूंनी आपल्या नादानपणाचें प्रदर्शन करू नये हें बरें. चवथा म्हणतो आम्ही कांही केले नसेल. पण इंग्रजांनी अस्पृश्यांसाठी काय केलें तें सांगा? या उफराट्या काळजाच्या लोकांस आम्ही अगदी स्पष्टपणें सांगू इच्छितों की हिंदू लोकांनी आमच्यासाठी काय केले, या प्रश्नास इंग्रजांनी तुमच्यासांठी काय केले हे कांही उत्तर नव्हे. ही मखलाशी आहे. इंग्रज बोलून चालून परके. त्यांनी कांही केले नसेल तर त्यांच्यावर रूसण्याचा कोणताहि हक्क नाहीं. परंतु तुम्ही आमचे म्हणवितां, आम्हांला कवटाळतां, प्रसंग पडला असतांना आर्यधर्माच्या व आर्यस्त्रियांच्या संरक्षणाचा आमच्यावर भार ठेवितां त्या तुम्ही आमच्यांसाठी काय केलें, तें सांगा ? इंग्रज परके, सरकारीरीत्या ज्या गोष्टी अस्पृश्यांच्या हिताप्रित्यर्थ करावयास पाहिजे होत्या त्या करून तुम्हाला त्यांनी अस्पुश्यतानिवारणाच्या कामीं मदत केली नसेल. पण ज्या गोष्टीं निव्वळ लोकमतावर अवलंबून आहेत, ज्या घडवून आणण्यास कायदा नको अशा कोणत्या गोष्टी तुम्ही केल्या आहेत? हिंदु धर्मांची देवळें खुलीं केलीं ? शाळा मोकळ्या केल्यांत, कां सार्वजनिक पाणवठे खुले केले ? या गोष्टी करण्याला इंग्रज सरकारची कांहीं आडकाठी नव्हती. या गोष्टी तुमच्या मनावरच्या होत्या, व त्या करणें न करणें सर्वस्वी तुमच्या हातांत होतें. पण त्यांपैकी एकहि गोष्ट तुम्ही केली आहे काय ? यांपैकीं एकहि गोष्ट तुम्ही केली नाहीं इतकेंच नव्हे, तर त्या घडवून आणण्यास लोकमत वळविण्याचा अल्प स्वल्पसा प्रयत्न देखील केला नाहीं. स्वराज्यासाठी वाहून घेतलेल्या काँग्रेस भक्तांनी १९१७ सालापर्यंत आधी राजकीय मग सामाजिक 'असे सामुदायिक प्रश्नांचे वर्ग पाडून नुस्त्या राजकीय प्रश्नांचा काथ्याकूट केला. अस्पृश्यता निवारण्याच्या प्रश्नाला मुळी महत्त्वच मिळूं दिलें नाहीं. स्वराज्य मागतां आणि ६ कोटी प्रजेला दडपून ठेवतां असा कोणी ठपका देतील आणि मग उजळ माथ्याने स्वराज्य मागतां येणार नाहीं म्हणून की काय काँग्रेसनें १९१७ सालीं अस्पृश्यता निवारणाचे सोंग आणून एक ठराव पास केला. पण तो तेथेच धूळ खात पडला. त्यानंतर म. गांधीची लाट
उसळली तींत अस्पृश्यता हा हिंदुधर्मावर मोठा कलंक आहे, हें एक सूत्र जन्माला
आलें. पण म. गांधींना ” सामर्थ्य आहे चरख्याचें ॥ जो जो फिरवील तयाचें “ या महामंत्राशिवाय दुसरें कशांतच तथ्य नाहीं असें वाटत असल्यामुळें त्यांनी अस्पृश्यतानिवारणाचा कार्यक्रम जोराने असा कधींच चालूं केला नाहीं. त्या कार्यक्रमाची त्यांना खरोखरच विशेष आवड आहे की काय याबद्दल आम्हास तरी