आजवरि होतों तुझे सत्तेखाली | तोवरि तों केली विटंबना - Page 406

३६२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

कमिशनपुढें मांडलेल्या योजना फलद्रुप झाल्यास हिंदुस्थानात कधीहि न घडलेली गोष्ट घडून येणार आहे. अस्पृश्यवर्ग हा सत्ताधीश होणार आहे. त्याच्या उद्धारास राजकीय सत्तेचा आधार सांपडणार आहे. ही गोष्ट अस्पृश्योन्नतीच्या दृष्टीने कांही लहान सहान नाहीं. तेव्हां अशा योजनेला नाकें मुरडण्यापूर्वी अस्पृश्य लोकांनी पूर्ण विचार करावा अशी आमची त्यांना आग्रहाची सूचना आहे.

सायमन कमिशनशीं सहकार्य केल्याबद्दल राष्ट्रीयब्रुव वृत्तपत्रकारांचा मोठा रोष झालेला आहे. व अस्पृश्य वर्ग देशद्रोही आहे, अशी एकच कोल्हेकुई त्यांनी उठविली आहे. सायमन कमिशनवर हिंदी माणसांची नेमणूक केली नाहीं, हा हिंदुस्थानचा अपमान होय, असें या लोकांप्रमाणे आम्हांलाहि वाटत आहे. स्वाभिमान ही चीज या पुढारलेल्यांच्याच पांचविला पुजलेली आहे असे नाही. मागासलेल्या । वर्गांनाहि स्वाभिमान आहे. व त्यांच्यात ज्या आत्मोद्धाराच्या चळवळी चालू आहेत त्या स्वाभिमानाच्याच चळवळी होत. या दृष्टीने पाहत पुढारलेल्या लोकांनी चालविलेल्या बहिष्काराच्या चळवळीत आम्हांला भाग घेता आला असतां तर त्यांत आम्हाला आनंदच वाटला असता, परंतु या चळवळीत अस्पृश्यांनी कां भाग घेतला नाही, याचें कारण स्पष्ट आहे. पुढारलेल्या हिंदी गृहस्थाची कमिशनवर नेमणूक केली असती तर अस्पृश्यांच्या प्रश्नांची काय वाट लागली गेली असती याचा तर्क करण्याचे कारण उरलें नाहीं. नेहरू कमीटीचा रिपोर्ट सर्व अस्पृश्यवर्गाच्या नजरेसमोर आहेच. नेहरू कमीटीच्या रिपोर्टात अस्पृश्यांना कोणत्या सवलती दिल्या आहेत ? मुसलमानांच्या प्रश्नापेक्षा अस्पृश्यांचा प्रश्न नेहरू कमीटीला कमी महत्वाचा वाटला नाहीं काय ? स्पृश्य वर्गाच्या सहानुभूतीशी अस्पृश्यांच्या हितसंबंधाची गांठ घालून देऊन ती कमिटी मोकळी झाली नाहीं काय ? ही सहानुभूति किती तकलादी अतएव अविश्वसनीय आहे, याचा नेहरू कमीटीने विचार केला काय ? कांही नाहीं. अस्पृश्यांचा प्रश्‍न सामाजिक आहे, शिक्षणाने तो सुटणार आहे, त्यांच्यासाठी विशेष योजना कांही करणें नको, असा झकपक अभिप्राय नेहरू कमीटीनें देऊन टाकला आहे. जणू अस्पृश्यता ही अगदीं साधी बाब आहे ! नेहरू कमेटींतील लोक अथवा त्यांचे भाईबंद हे जर सायमन कमिशनवर असते तर जें नेहरु कमिटीत घडलें तेंच त्यांनी सायमन कमिशनकडून करविले असतें, या म्हणण्यास कांही प्रत्यवाय दिसत नाहीं. असल्या एखाद्या पुढारलेल्या माणसाची कमिशनवर नेमणूक केली असती तर हिंदी राष्ट्राचा मान राखण्यांत आला असता, हें खरें, पण अशा नेमणुकीपासून अस्पृश्य वर्गाचा घात झाला असता, ही गोष्ट आम्ही विसरु शकत नाही. . हा ' आमचा माणूस ' आहे असे म्हणण्यासारखा एक जरी पुढारी असता तरी त्याला नेमण्याविषयीं आम्ही आग्रह