आजवरि होतों तुझे . . . केली विटंबना ३६३
धरला असतां, पण आमचा म्हणण्यासारखा एकहि माणूस आम्हाला दिसला नाहीं
आणि म्हणूनच कोणता तरी एखादा हिंदी माणूस कमिशनवर असण्यापेक्षा बिन
हिंदी माणसाचें कमिशन असणे बरें, असें आमचे प्रामाणिक मत झालें. आणि त्यामुळेच सायमन कमिशनशीं सहकार्य करण्याचा आम्ही निश्चय केला. जे लोक आम्हाला देशद्रोही म्हणून म्हणतात त्यांनी प्रथम या सर्व प्रश्नांचा विचार कारावा व मग अस्पृश्यांवर स्वाभिमानशून्यतेचा शिक्का मारण्यास पुढें यावें. ब्रह्मद्वेष, देशद्रोह, वगैरे कायम ठशाच्या आरोळ्यांनी बिचकून जाण्याइतकें अस्पृश्य नाजुक प्रकृतीचे राहिले नाहींत. आमचे व्हावें व आमचा विश्वास संपादन करावा मग आम्ही तुमचें होऊ व तुम्हाला आमचे मानूं तोंपर्यंत आम्ही आमची वाट स्वतंत्रपणें चालत आहोंत. आम्ही कोणाचेहि द्वेष्टे नाहीं. पण आमचे द्वेष्टे कोण आहेत हें मात्र आम्ही ओळखून आहोंत. त्यांचे सामाजिक अतिक्रमण चव्हाट्यावर मांडण्यांत व त्या अतिक्रमणापासून आमचे संरक्षण करण्यास आम्हांस राजकीय सत्तेचा भरपूर अंश द्या असें म्हणण्यांत जर ब्रह्मद्वेष, अगर देशद्रोह होत असेल तर तो करणें हें आमचें पवित्र कर्तव्य आहे, असें आम्ही मानतो.
अग्रलेख : बहिष्कृत भारत, ता. १६ नोव्हेंबर १९२८.