७९
ब्राह्मण्य म्हणजे बहुजन समाजाच्या अज्ञानावर
आधारलेले जाति वर्चस्व
१ हिंदी स्वातंत्र्यसंघाच्या बंगाल व महाराष्ट्र अशा दोन शाखांचे जाहिरनामे आम्हीं या अंकात दुसरीकडे प्रसिद्ध केले आहेत. हे जाहिरनामे तुलनात्मक दृष्टीनें वाचून पाहिल्यास वाचकांना बराच बोध होण्यासारखा आहे. हिंदी स्वातंत्र्यसंघाचे मूळ उत्पादक पंडित जवाहिरलाल नेहरू हे राजकीय बाबतींत जितके उर्ध्वगामी आहेत तितकेच सामाजिक क्षेत्रांत मूलगामी आहेत. पण त्यांच्या अनुयायांच्या दृष्टीकोणांत प्रांतनिहाय परिस्थितीनुसार फरक पडलेला आढळतो. प्रस्तुत जाहीरनाम्यांपैकी बंगाल शाखेचा जाहिरनामा बहुतांशीं पंडितजींच्या तत्वाला धरून आहे. पण महाराष्ट्र शाखेचा जाहिरनामा लक्षपूर्वक वाचून पाहिल्यास तो महाराष्ट्रांतल्या टिळक-चिपळूणकर परंपरेच्या वळणावर गेला असल्यांचें दिसून येईल.
२ या टिळक-चिपळूणकर परंपरेचे ब्रीद राजकीय सुधारणेचा पुरस्कार व समाज सुधारणेला विरोध हें असल्याचें महशूरच आहे. कै. आगरकर प्रभृति सुधारकांनी चालविलेल्या समाज सुधारणेच्या प्रयत्नांना कै. टिळकांनी होती नव्हती तेवढी शक्ती खर्च करून विरोध केला. कै. आगरकरांचे प्रयत्न अत्यंत तुटपुंजे होते. त्यांच्या कार्याची व्याप्ति ब्राह्मण समाजापुरती मर्यादित होती. समाजाचे खालचे थर हालविण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आढळत नाही. तरीपण कै. टिळकांनी त्यांचेवर विरोधाचे शस्त्र उपसलें. सामाजिक प्रश्नांविषयीं कै. टिळकांची मतें सुविख्यातच आहेत. अस्पृश्यता निवारणाच्या जाहिरनाम्यावर त्यांनी सही करण्याचे नाकारले होतें. सहभोजनांनी जातीय भांडणे मिटतीं तर एका ताटांत जेवणारीं एका आईचीं मुलें कां भांडतीं अशी वकिली थाटाची, भ्रामक व कुचेष्टेखोर टीका त्यांनी सहभोजनावर केली होती. आणि त्यांच्या सुदैवाने ब्राह्मणव्यतिरिक्त वर्गांत त्यावेळी म्हणण्यासारखी जागृतीही झाली नव्हती. त्यामुळे त्यांची अडवणुक करणारे कोणीही त्यांना भेटले नाहींत
† पाहा, परिशिष्ट क्रमांक-४०.
+ पाहा, परिशिष्ट क्रमांक-४१.