३६६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
पण अस्पृश्यसमाजानें स्वतःसाठी जर कांहीं राजकीय सवलती मागितल्या तर मात्र तो जातिनिष्ठ ठरून या संघाच्या रोषाला पात्र होणार ! कारण जातिनिष्ठ चळवळींना विरोध करणे हाही या संघाचा एक मुख्य उद्देश आहे. स्वातंत्र्यसंघाचे प्रणेते पं. जवाहिरलाल यांचाही जातिनिष्ठ चळवळींना विरोध आहे. पण जातिनिष्ठ चळवळींच्या सदरांत ते अस्पृश्यांच्या किंवा ब्राह्मणेतरांच्या चळवळींना ओढीत नाहींत. या सामाजिक हक्कांच्या चळवळीं आहेत हें त्यांना समजलें आहे पण टिळक परंपरेने ग्रासलेल्या महाराष्ट्रीय स्वातंत्र्यसंघाच्या सभासदांना मात्र हें कळणार नाहीं. आणि विशेष लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट ही कीं, या संघाचे कांहीं सभासद ब्राह्मणसभेचे सभासद आहेत ! वास्तविक खरी जातिनिष्ठ संस्था जर कोणती असेल तर ती ब्राह्मण सभा होय. ब्राह्मणेतर किंवा अस्पृश्य यांच्या चळवळींत जर जातीयता असेल तर ती संरक्षक स्वरूपाची (Defensive) आहे. आपले मानवी हक्क ब्राह्मणेतरांना व अस्पृश्यांना मिळवायचे आहेत. दुसऱ्या कोणाचे हक्क लुबाडून त्यांना आपले दास करण्याचा त्यांचा हेतु नाहीं. पण टिळक परंपरेच्या दृष्टीने या स्वहक्क-संपादन-रक्षणाच्या चळवळी जातिनिष्ठ ठरतात; व आपल्या जातिश्रेष्ठत्वाचा डळमळता डोलारा परत स्थिरस्थावर करण्यासाठी ब्राह्मणांनी स्थापन केलेली ब्राह्मण सभा मात्र राष्ट्रीय ठरते ! म्हणूनच ब्राह्मण सभेचे सभासद जातीयत्वाचें वावडें असलेल्या स्वातंत्र्यसंघाचे सभासद होऊ शकतात ! या संघावर टिळक, चिपळूणकर परंपरेचा पगडा बसलेला नसता, तर अर्थांतच असा प्रकार झाला नसता. डॉ. रवींद्रनाथ टागोर, देशबंधु दास वगैरेंच्या बंगाल प्रांतातील स्वातंत्र्यसंघात असा प्रकार झाला नाहीं. त्या संघानें जातिबद्ध पौरोहित्यावर हत्यार उपसलें आहे, व सहभोजन, मिश्रविवाहद्दारा समाज समतेचा पुरस्कार केला आहे. पण महाराष्ट्रीय स्वातंत्र्यसंघाने हे प्रश्न अचूक वगळले आहेत. कांहीं आरसे असे असतात कीं, त्यात प्रतिबिंब पडायचे तें सरळ न पडतां वेडेवाकडें पडतें. पं. जवाहिरलाल नेहरूंच्या तत्वाची हीच स्थिती महाराष्ट्रांत झाली आहे.
५ आश्चर्य हें कीं, अस्पृश्यसमाजाच्या वतींनें सायमन कमिशनशीं सहकार्य केल्याबद्दल हेंच लोक आम्हांला देशद्रोही म्हणत असतात. वास्तविकपणें खरे देशद्रोही हेच होत. आपल्या स्वार्थासाठी देशातील एका मोठ्या समाजाला दलितावस्थेंत डांबून ठेवणारे हेच लोक होत. यांनाच आम्हीं ब्राह्मण्यग्रस्त म्हणतों. ब्राह्मण्य हें निव्वळ सामाजिक आहे असें नाहीं. सामाजिक स्पर्शास्पर्शाच्या भावनेशिवाय राजकीय जातिवर्चस्वाचा ब्राह्मण्यांत अंतर्भाव होतो.
पाहा, परिशिष्ट क्रमांक-११.