ब्राह्मण्य म्हणजे बहुजन . . . आधारलेले जाति वर्चस्व ३६७
किंबहुना आजच्या ब्राह्मण्याच्या अंतरंगाचा ठाव शोधल्यास तेथे जातिवर्चस्वाची लालसा जितक्या प्रमाणांत दिसून येईल, तितक्या प्रमाणांत स्पर्शास्पर्शाची भावना आढळणार नाहीं. आजच्या ब्राह्मण्यग्रस्तांना जर कसली चिंता लागली असेल तर ती शिवाशीवीचा धर्म टिकविण्याची नसून आपलें जातिवर्चस्व अबाधित ठेवण्याची होय. यांच्या जातिवर्चस्वाच्या बुरुजाला सुरंग लागणार तो अस्पृश्यसमाजांतूनच हें त्यांना कळत आहे; व म्हणूनच अस्पृश्यसमाजावरचा सामाजिक बहिष्कार उठविणे त्यांच्या जिवावर आलें आहे. ब्राह्मणेतर बहुजनसमाजाचें अज्ञान व तज्जन्य धर्ममूढपणा त्यांच्या पथ्यावरच आहेत. ब्राह्मणेतरांकडून अस्पृश्यांना परस्पर पायबंद लागतो, म्हणूनच हे ब्राह्मण्यग्रस्त लोक ब्राह्मणेतरसमाजाच्या धार्मिक दुराग्रहाच्या नाड्या सैल करण्यास नाखूष असतात.
६ ब्राह्मणेतरसमाज अद्याप शिवाशिवीच्या धर्माचा गुलाम आहे हें आम्हांला कबूल आहे. पण प्रयत्न केल्यास त्याचें मन वळवणें फार सोपें आहे. दादरच्या लोकहितवादीसंघानें परवां जो नवरात्रोत्सव साजरा केला त्यांत अस्पृश्यांनी स्पृश्यांबरोबर समानतेच्या नात्यानें भाग घेतला होता. देवीची पूजा व आरती करण्यासही स्पृश्यांनीं अस्पृश्यांना हरकत घेतली नाहीं पण दादरच्या सार्वजनिक गणेशोत्सवांत जेव्हां अस्पृश्यांनी समानतेच्या हक्कांची मागणी केली तेव्हां, अस्पृश्यांना मुक्तद्वार ठेवल्यास स्पृश्य लोक पिसाळतील, मारामाऱ्या होतील, मुर्दे पडतील, रक्तपात होईल अशी भीति त्या उत्सवाच्या ब्राह्मण्यग्रस्त चालकांनी घातली. पण नवरात्रोत्सवांत यांपैकी एकही प्रकार घडला नाहीं. अथपासून इतिपर्यंत कोणीहि स्पृश्य इसम अस्पृश्यांबरोबर मारामारी करण्यात उद्युक्त झाला नाहीं. सांगण्याचा हेतु एवढाच कीं, दोष आहे तो स्पृश्य बहुजनसमाजाचा नसून, त्याचे पुढारी म्हणविणारांचा आहे. स्पृश्यवर्गीय पुढाऱ्यांनी मनापासून प्रयत्न केल्यास, शिवाशिवीच्या धर्माचा नायनाट होण्यास मुळींच वेळ लागणार नाहीं.
७ पण अंदरकी बात अशी आहे कीं, त्यांना तसे प्रयत्नच करावयाचें नाहींत. याचें कारण त्यांचें ब्राह्मण्य होय. कोणतीही सार्वजनिक नांवाखालीं खपणारी संस्था घ्या, अगर कोणतीही सार्वजनिक चळवळ घ्या. त्यांत या ब्राह्मण्यग्रस्तांचें. संख्याधिक्य असलेलें दिसून येईल. या लोकामुळेंच सर्व चळवळींचा विचका होऊन गेला आहे. जर एखाद्या चळवळींत यांच्या ब्राह्मण्याचा वरचष्मा रहात नसेल तर त्या चळवळीचे तीनतेरा वाजविण्यास हे केव्हांच मागेंपुढें पहात नाहीं. घरीं दारीं, देवळीं, बिऱहाडी इतकेंच नव्हे तर स्मशानांतसुद्धा यांचें ब्राह्मण्य यांना पाहिजे. आमचे ब्राह्मण्य जर स्वराज्यांत टिकणार नसेल तर तें स्वराज्य आम्हांला मुळींच नको असें म्हणण्यापर्यंतही यांची मजल गेलेली आहे. आणि