ब्राह्मण्य म्हणजे बहुजन समाजाच्या अज्ञानावर आधारलेले जाति वर्चस्व - Page 412

३६८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

हे ब्राह्मण्य म्हणजें काय ? तर बहुजन समाजाच्या अज्ञानावर आधारलेलें यांचे जातिवर्चस्व, पण तें fea देण्यास आतां दलितवर्ग तयार नाहींत, व यांचा तर तें टिकविण्याचा संकल्प आहे. स्वतःच्या जातिवर्चस्वासाठीं देशांतील बहुसंख्य समाजांच्या माणुसकीचा बळी घेऊं पहाणारे हे लोकच खरे समाजकंटक व राष्ट्राचे कुलांगार होत. या लोकाचें अस्तित्व म्हणजे सैतानानें हिंदुस्थानला दिलेला शाप असें म्हणावयास मुळींच हरकत नाहीं.

८. याच राष्ट्रद्रोही दुर्जनांनीं महाराष्ट्र काँग्रेस कमिटींत राजकारणापासून धर्माची फारकत करण्याच्या मिषानें अस्पृश्यतेचा प्रश्‍न काँग्रेसच्या कार्यक्रमांतूंन काढून टाकण्याचा प्रयत्न केला. पण यांचा खरा राष्ट्रदोह निराळाच आहे. तो पहायचा झाल्यास हिंदुसभेकडे वळलें पाहिजे. मूठभर मुसलमानापासून महान्‌ हिंदुजातीचें रक्षण करण्यासाठीं ही चळवळ सुरू करण्यांत आली आहे, असें सांगण्यांत येतें. पण वास्तविक प्रकार निराळाच आहे. जर या लोकांना खरोखर संघटना करायची असती तर विघटणाजनक असा जो शिवाशिवीचा धर्म त्याची हकालपट्टी त्यांनी अगोदर केली पाहिजे होती. पण या बाबतींतील त्यांचे प्रयत्न किती उथळ स्वरूपाचे व अविश्वनीय आहेत हें आतां सर्वाना कळलें आहे. त्यांचा सारा जोर शुद्धीच्या चळवळीवर आहे. परधर्मांतील कितीशी मेंढरें शुद्ध होत्सातीं या विषमतेच्या चिखलांत लोळायला येत असतील व कांहीं आलीच तर किती दिवस रहात असतील हा प्रश्‍नच आहे. पण तूर्त आपणाला त्याच्यांशी कर्तव्य नाहीं. या चळवळीचा हेतु कोणता एवढेंच आपणांस पहावयाचे आहे. कोणत्या तरी उपायानें महान्‌ हिंदुजातीची लोकसंख्या वाढविणें हाच तो हेतु होय. त्यायोगे यांच्या जातिवर्चस्वाचें आयुष्य आणखी थोडे दिवस वाढणार आहे. म्हणजे ही चळवळ शुद्ध राजकीय स्वरूपाची आहे. अज्ञ व धर्मवेड्या बहुजन समाजाचा पाठिंबा मिळविण्यासाठी तिच्यांत धर्म घुसडण्यांत आला आहे. या ब्राह्मण्य ग्रस्तांनी पूर्वी काँग्रेसमध्ये धुमाकुळ घातला होता. पण म. गांधींच्या चळवळीमुळें त्यांचें तेज तेथें पडेनासें झालें, व काँग्रेसमार्फत ब्राह्मणी स्वराज्य किंवा ब्राह्मण्यग्रस्तांच्या भाषेंत बोलायचे म्हणजें हिंदुपदपातशाही स्थापन करण्याची त्यांची आशा समूळ नष्ट झाली. इकडे दलितवर्गातही जागृति होऊं लागली. अशा स्थितींत आपल्या जातिवर्चस्वाची पकड स्पृश्यास्पृश्य समाजावर कायम ठेवण्यासाठी त्यांनीं ही हिंदुसभेची चळवळ हातीं घेतली आहे, व तिच्यामार्फत बहुजन समाजाचा धर्ममूढपणा चिरस्थायी करण्यास त्यांनी कंबरा कसल्या आहेत. आपल्या स्वार्थासाठीं हे ब्राह्मण्यग्रस्त बहुजन समाजाचा म्हणजेच राष्ट्राचा द्रोह करण्यास कसे मागें पुढें पहात नाहींत, याचा आणखी कोणता पुरावा पाहिजे ?

७०७७

प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. १६ नोव्हेंबर १९२८.