महार वतन बिलावरील कांहीं आक्षेप - Page 413

Zo

महार वतन बिलावरील कांहीं आक्षेप

गतवर्षी “ महार आणि त्यांचें वतन “या विषयावर आम्ही चार अग्रलेख लिहिले; व त्यांत महारांचा वतनापासून कसा अधःपात झाला आहे व तो टाळण्याकरितां वतनाच्या कायद्यांत कोणत्या सुधारणा करणे अवश्य आहे याचें सांगोपांग विवेचन आम्ही केले. या लेखमालेंतून जेव्हां वतनाविषयींचे आमचे विचार आम्ही प्रदर्शित केलें तेव्हां आम्हाला असें भय वाटत होतें कीं, महार लोकांचा आम्ही सुचविलेल्या सुधारणांच्या बाबतींत विरोध होईल. ती आमची अपेक्षा खरी ठरली. "'वतनावर गदा “ या मथळ्याखाली कांही बेअकली लोकांनी एक हस्तपत्रक प्रसिद्ध करून तें महार लोकात वाटलें; व कांही ठिकाणीं महार लोकांचा गैरसमज करून त्यांच्या करवी एकदोन निषेधपर सभाहि त्यांनीं भरविल्या. पण महार लोकांची जी कांही विरोधी वृती सुरवातीस दिसत होती ती आतां अगदीं साफ निवळून गेली आहे. आणि वतन बिल कायदे कौन्सिलांत मांडण्याचे पूर्वी महार लोक जे विरूद्ध होतें ते आतां झाडून एकमतानें बिलाला पाठिंबा देत आहेत. या बिलाला आतां जो विरोध होत आहे तो अगदीं अनपेक्षित दिशेकडून होत आहे. महार लोक जेव्हां या बिलास विरूद्ध होते त्यावेळीं आमच्या स्पृश्य बंधूंनीं आम्हांस मोठा आधार दिला. वतनावरच्या आमच्या विचारांचे त्यांनी समर्थन केलें. इतकेंच नव्हें तर '“ वतनावर गदा “ म्हणून ओरडणाऱ्या महार भाईच्या मूर्खपणाचें माप त्यांनीं त्यांच्या पदरांत घातलें. परंतु बिलाचें पहिलें वाचन पास झाल्यानंतर आमच्या स्पृश्य बंधूंची दृष्टि या बिलाच्या बाबतींत अगदी उलट होत चाललेली आहे. बिल कौन्सिलमध्यें आणण्यापूर्वी ज्यांनीं आमच्या विचारास पूर्ण संमति दिली होती ते बिलाच्या पहिल्या वाचनानंतर थोडासा विरोध दर्शवू लागले आहेत. ठल्लीं हें बिल कौन्सिलच्या निवडक सभासदांच्या एका कमिटीकडे सोंपविण्यांत आलें आहे. या कमिटीचा रिपोर्ट आल्यानंतर दुसऱ्या व तिसऱया वाचनांकरितां तें बिल कौन्सिलपुढें येऊन काय तो शेवट लागणार आहे. विरोधकांच्या म्हणण्यांत कांही हंशील असल्यास त्याचा योग्य तो विचार कमिटीकडून झाल्याशिवाय राहणार नाहीं. परंतु हे आक्षेप जनतेंत तसेच पसरूं दिल्यास बिलाविरूद्ध लोकांचीं मनें निष्कारण कलुषित होणार आहेत. तसें न व्हावें म्हणून वरील आक्षेपांचे निरसन करून झालेला गैरसमज दूर करणें कार्यसिद्धीच्या दृष्टीनें आम्हांस आवश्यक वाटतें. यास्तव त्याच विषयावर आज पुनः आम्ही लिहीत आहोंत.

डब्ल्यू-२०७३-२४ अ