महार वतन बिलावरील कांहीं आक्षेप - Page 420

३७६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

या बिलाच्या सहाव्या कलमाला विरोध व्हावा अशी राष्ट्रवीरकारांची मनापासून इच्छा आहे. पण हें बिल अस्पृश्यवर्गाच्या हिताचें असल्यामुळें ब्राह्मणेतर पक्षाचे लोक खोटी माया धरून त्यास विरोध करण्यास कचरतील अशी त्यांना भीति वाटत आहे व म्हणूनच ते शेतकरीवर्गास आग्रहानें असें सुचवीत आहेत कीं या कामीं कांहीं मुरवत न धरतां बिनघोर विरोध करा. ही चेतावणी देतांना ब्राह्मणेतरपक्ष मोठा स्वार्थत्यागी आहे असें राष्ट्रवीरकारांना वाटत असले पाहिजे !! त्याशिवाय त्याला या ठिकाणी स्वार्थत्यागबुद्धी बाजूला ठेवण्याची सल्ला देण्याची आवश्यकता राष्ट्रवीरकर्त्यांना वाटली नसती. रााष्ट्रवीरकारांच्या सल्ल्याप्रमाणे जरी ब्राह्मणेतरपक्षानें या बिलाला विरोध केला, तरी त्यानें अस्पृश्यांना मदत केली नाहीं असा दोषारोप आम्हीं त्यांच्यावर केव्हाच करणार नाहीं. ब्राह्मणेतर हे संन्यासी नाहींत हें आम्हाला माहीत आहे. त्यामुळें अस्पृश्यांच्या हितासाठी त्यांनीं आपल्या स्वार्थावर पाणी सोडले नाही तर त्यात वावगें तें काय आहे? मद्रासेंत ब्राह्मणेतरपक्ष सत्ताधीश होण्यापूर्वी तेथील सरकारनें अस्पृश्यवर्गाची सुधारणा करण्याकरितां एक स्वतंत्र खातें उघडलें होते ; व त्या खात्यातफ अस्पृश्यांना लहानसहान तुकडे लागवडीस देऊन, त्यांचा एक स्वतंत्र शेतकरीवर्ग तयार करण्याचें काम उत्तम प्रकारें चालविलें होतें. पण ब्राह्मणेतरपक्षाच्या हातीं सत्ता आल्याबरोबर त्यांनीं हें खातेच Age करून टाकलें. आणि तें त्यांनी कां करू नये ? मोठमोठ्या जमिनदार लोकांची सारी मदार मजुरांवर. ते मजुरच जर शेतकरी झाले तर इनामदारांच्या जमिनी कोण नांगरणार ? मद्रासेंतील ब्राह्मणेतरपक्ष हा मोठमोठ्या इनामदारांचा पक्ष आहे. ज्या अस्पृश्य मजुरांवर त्यांचीं सारी भिस्त तेच शेतकरी झाले तर ' यांचें कसें निभणांर ?” जें मद्रास इलाख्यात घडले तें मुंबई इलाख्यांतही घडण्यासारखें आहे. त्याला राष्ट्रवीरकारांचा सल्ला नको. आपल्या तोंडचा घांस काढून दुसऱ्यांच्या तोंडात कोणीच घालीत नाही. स्वार्थाच्या झगड्यांत भाऊ भावाची गय करीत नाही. मग ब्राह्मणेतरांनी अस्पृश्यांची गय करावी असें कोणत्या न्यायानें म्हणतां येईल ? ब्राह्मणेतर व अस्पृश्य हे एका नांवाखाली आहेत म्हणून अस्पृश्यांनी वाटेल तें मागावें व ब्राह्मणेतरांनी द्यावें, किंवा ब्राह्मणेतरांनी वाटेल तें मागावें व अस्पृश्यांनी द्यावें हा दुधखुळा न्याय आम्हासही मान्य नाहीं ; व म्हणूनच आम्ही राष्ट्रवीरकारांच्या व तदुप्रदेशानुयायी ब्राह्मणेतरांच्या कठोरपणाला मुळीच दोष देत नाहीं. आमचे इतकेच सांगणें आहे कीं विरोध करायचा असेल, तर ज्या कारणांमुळे तुम्हीं विरोध करू चाहतां ती रास्त आहेत अशी खात्री करून घेऊन मग करा. चुकीचा समज करून घेऊन विरोध करू नका.

अग्रलेख : बहिष्कृत भारत, ता. ७ डिसेंबर १९२८.