देशभक्त लाला लजपतराय राजकारण व समाजकारण यांत क्रांतिकारक. - Page 421

८१
देशभक्त लाला लजपतराय
राजकारण व समाजकारण यांत क्रांतिकारक

१. देशभक्त लाला लजपतराय यास गेल्या महिन्याच्या १७ तारखेस एकाएकीं हृदयक्रिया बंद पडून मृत्यू आला ही गोष्ट नमूद करण्यास आम्हांला अत्यंत दु:ख होत आहे. सायमन कमिशन लाहोरला गेले असतां, त्याला परत जा म्हणून सांगण्याकरितां जी बहिष्कारवादी लोकाची चमू स्टेशनवर उपस्थित झाली होती, तिच्या अग्रभागी लालाजी होते. गर्दी मागें हटविण्याचा प्रयत्न करीत असतां एका पोलीस अधिकाऱ्यानें लालाजींच्या छातीवर लाठी मारली. हा लाठीचा आघातच लालाजींचीं हृदयक्रिया बंद होण्यास कारणीभूत झाला असे डाँक्टरलोकांचे मत आहे. तें खरें असल्यास, असल्या उन्मत्त व राक्षसी वृत्तीच्या पोलीस अधिकाऱ्यांचा निषेध करावा तितका थोडाच आहे.

२. तें कांहीं असो. लालाजीच्या मृत्युमुळें देशांतील एक कर्तबगार पुढारी नाहींसा झाला यांत मात्र शंका नाहीं. हिंदुस्तानला राजकीय पुढाऱ्यांची वाण कधींच पडली नाही. पण लालाजीसारखे प्रामाणिक वृत्तीचे, स्वार्थ त्यागी व हातीं घेतलेल्या कामांत तनमनधन खर्च करणारे पुढारी फारच थोडे. पुढारीपणाला हपापलेले व त्याच्यासाठी आपली सदसद्विवेकबुद्धी सैतानाला विकणारेच फार. यांच्या उक्तीकृतींत कमालीचा विसंगतपणा असायचा व तो लोकांच्या ध्यानांत आला म्हणजे ‘Fea रिझर्वेशन ' ची बात झोंकून हे मोकळे व्हावयाचे. पण लालाजींच्या आयुष्यक्रमांत हा प्रकार आढळत नाहीं. नसोपंती दुटप्पीपणा व अय्यंगारछाप लफंगेपणा, लालाजींना माहीत नव्हता. त्यांची कार्यक्षमता दांडगी होती. जास्त बडबड व गडबड न करतां धिम्मेपणानें अंगीकृत कार्य पार पाडणें यांत लालाजींच्या चारित्र्याचे वैशिष्ट्य आहे.

३. लालाजींचा जन्म पंजाब प्रांतांत एका गरीब वैश्य कुलांत १८६५ सालीं झाला. त्यांचे वडील आर्यसमाजी होते. त्यामुळें लालाजींना आरंभापासूनच उदारमतवादाचें बाळकडू पाजलें गेलें. आज आर्य समाजाला ' सनातन धर्माने ' गिळंकृत केलें आहे. पण त्या कालीं आर्यसमाज व ' सनातनधर्म ' यांचा उभा दावा होता. कारण त्या कालीं आर्यसमाज मुसलमानांच्या अतिक्रमणापेक्षां जाति भेदादि हिंदुसमाजांतर्गत दोषांकडेच जास्त लक्ष देत असे. त्यामुळे जरी पुराण्या