८२
डॉ. आंबेडकरांनी स्वाभिमानाच्या व स्वावलंबनाच्या
पायावर सुरू केलेल्या चळवळीविषयी
द्वेषमूलक भावना
कांहीं दिवसांपूर्वी सोलापूर येथें झालेल्या हिंदु-मुसलमानांच्या झगड्यांत अस्पृश्यवर्गानें हिंदूंची बाजू घेण्याचे नाकारल्यामुळे सोलापूर म्युनिसीपॅलिटीनें अस्पृश्यांच्या बोर्डीगची ग्रँट बंद केली, असें विधान सायमनकमिशन पुढील साक्षींत केल्याच्या आरोपावरून, सोलापूर म्यु. नें डॉ. आंबेडकरांबद्दल निषेधपर ठराव पास केला आहे. हा ठराव सकारण असता तर आम्हांला त्याबद्दल कांहींच वाटलें नसतें. पण तो तसा नाहीं. कमिशनपुढे डॉ. आंबेडकरांची साक्ष चालू असतां मि. अब्दुल लतिफ यांनी विचारलेल्या “ मुसलमानांना चिरडण्यासाठी अस्पृश्यांची मदत सोलापूरच्या हिंदूंनी मागितली काय व अस्पृश्यांनीं ती नाकारल्यामुळे सोलापूर म्यु. ने अस्पृश्यांच्या बोर्डीगची ग्रँट बंद केली काय ? “ या प्रश्नाचे उत्तर देतांना डॉ. आबेडकर म्हणाले “ होय, अशी मदत मागण्यांत आली होती. अस्पृश्यांनीं या बाबतींत माझें मत विचारलें असतां मी त्यांना तटस्थ राहाण्याची सल्ला दिली. ग्रँट नाकारण्याचे कारण मला माहीत नाही. पण अस्पृश्यांच्या बोर्डींगच्या सुपरिंटेंडंटनीं म्यु. तील बहुमतवाल्या पक्षाशीं सहकार्य करण्याचे नाकारल्यामुळे त्यांना दहशत बसविण्यासाठीं तसें करण्यांत आलें असावें. “ या ठिकाणीं मि. अबदुल लतिफच्या एका प्रश्नांत दोन प्रश्न समाविष्ट झाले आहेत, व डॉ. आबेडकरांच्या उत्तरांतही, दोन प्रश्नांची दोन उत्तरें समाविष्ट झाली आहेत. अस्पृश्यांची मदत हिंदूंनी मागितली काय या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर डॉ. आंबेडकरांनी दिलें आहें. पण " अस्पृश्यांनी ती नाकारल्यामुळे ग्रँट बंद झाली काय ? “ या दुसऱया प्रश्नाला उत्तर देतांना '' ग्रँट बंद करण्याचें नक्की कारण आपल्याला माहित नाहीं” असें ते म्हणाले आहेत. पण डॉ. आंबेडकरांचा निषेध करण्याची सोलापूर म्यु. ला इतकी घाई झाली कीं, उत्तराच्या आरंभीच्या ' होय ' शब्दाच्या आधाराने मि. लतिफच्या दोन्ही प्रश्नांना डॉ. आंबेडकरांनी होकारार्थी उत्तर दिलें असें गृहीत धरून, त्यांनी निषेधपर ठरावाचा विधि एकदाचा उरकून घेतला.