सर्व ठिकाणीं सत्यान्वेषी बुद्धी व सारासार विचारशक्ती जागृत पाहिजे, ही लोकहितवादींची मुख्य शिकवण - Page 430

८५
सर्व ठिकाणीं सत्यान्वेषी बुद्दी व सारासार विचारशक्ती
जागत पाहिजे, ही लोकहितवादीची मुख्य शिकवण

या अंकापासून आम्हीं सुप्रसिद्ध लेखक गोपाळराव हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांच्या पत्रांचें पुनर्मुद्रण सुरू केलें आहे. सरळ व असंदिग्ध भाषा, सडेतोड विचारसरणी व भरीव व्यवहारज्ञान हे लोकहितवादींच्या लिखाणाचे विशिष्ट गुण आहेत. तत्त्वज्ञानाच्या निष्फळ गप्पांनी व तकंशास्त्रांच्या शब्दावडंबरी लंपडांवांनीं लोकांना भुलविण्या-झुलविण्याच्या भरीस लोकहितवादी कधीच पडले नाहींत. आपल्या सामाजिक व्यवहारांतील रोजच्या प्रसंगावर व त्यांच्या मागे असलेल्या भावभावनांवर त्यांनी लिहिलें आहे, आणि त्यांचें लिखाण अत्यंत स्पष्टोक्तीपूर्ण, निर्भीड व हृदयस्पर्शी आहे. भूतकालीन ' रामराज्या ' पेक्षां आजच्या सामाजिक आचारविचारांतील दोष हेच त्यांच्या लिखाणांचे मुख्य विषय असल्याचें दिसून येईल. लोकमान्यता मिळवायची असेल तर आपल्या दोषांचाही गुण म्हणून उदोउदो करणें व परकीयांच्या गुणांनाही दोष म्हणून त्याज्य ठरविणें, हा मार्ग आहे. पण लोकहितवादींनीं हा मार्ग कधींच अनुसरला नाहीं. आपल्या दोषांचे त्यांनीं कठोरपणें आविष्करण केलें व तसें करतांना अमके नाराज होतील अगर तमक्यांचीं मनें दुखावतील याविषयीं त्यांनीं पर्वा केली नाहीं.

जुन्या घातुक रूढी, जरीपुराण्या टाकाऊ कल्पना व समजुती, धार्मिक दुराग्रह व ढोंगीपणा इत्यादि विषयांवरही लोकहितवादींनीं सडेतोड लेख लिहिले आहेत; व ते सवाना मार्गदर्शक होतील असेच आहेत. सर्व ठिकाणीं सत्यान्वेषी बुद्धी व सारासारविचारशक्ती जागृत पाहिजे, ही लोकहितवादींची मुख्य शिकवण आहे. लोकहितवादींची परंपरा जर महाराष्ट्रांत चालली असती तर आपले सामाजिक प्रश्‍न आजच्या इतके सोडविण्याला कठीण होऊन बसले नसते. पण दुर्दैवाने टिळक-चिपळूणकर परंपरा टाळ्यांच्या कडकडाटांत पुढें आली, व लोकहितवादींची धिम्मी व कार्यक्षम परंपरा मागें पडली. याचें परिणाम आजवर महाराष्ट्राने भोगले आहेत, व अजूनही त्यांतून त्याची सुटका झाली नाहीं. असो. लोकहितवादींनी ७५ वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले “विचार आजच्या परिस्थितीतही उपयुक्त असेच आहेत.. आमच्या वाचकांना ते मार्गदर्शक होतील असें वाटल्यावरूनच आम्हीं तत्प्रकाशनाचें कार्य सुरू केलें आहे.

प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. ७ डिसेंबर १९२८.

डब्ल्यू-२०७३-२५ ब