८६
हिंदुंचे धर्मशास्त्र, त्याचे क्षेत्र आणि त्याचे अधिकारी
सर्व समाजात अत्यंत जरठ असा हा हिंदु समाज आज अनेक वर्षांच्या परकीयांच्या माऱ्यामुळें हादरून गेला आहे. सर्वच परिस्थितीत पराभूत झालेला माणूस जसा स्तंभित होऊन ' मला काय झाले ' असें विचारीत आपले स्वरुप तपासून पहावयास लागतो त्याच प्रमाणें हिंदु समाज बऱ्याच दिवसापासून आपले स्वरुप तपासून पाहत आहे. तथापि आपल्याला कोणता रोग झाला आहे व
आपण पदोपदीं कां पडतो याचा उलगडा अजूनहि त्याला पूर्णपणें झाल्याचे दिसत
नाही.
समाजशास्त्रवेत्ते असें सांगत आहेत कीं या देशातील लग्न पद्धति अत्यंत घातुक आहे. या देशातील लग्न पद्धतिमुळें आठ वर्षांच्या आंतील मुलीला साठ वर्षे झालेल्या वृद्ध कपीच्या माथी मारून देण्यात येतें. तसें न झालें तर लग्न म्हणजे
काय चीज आहें हे ज्यांस कळलें नाही अशा अर्भकाच्या गळ्यांत गुंतवून देण्यात
येतें. अल्प वयांत हा क्रणानुबंध घडल्यामुळे ज्याच्याशी किंवा जिच्याशी सारा जन्म कंठावयाचा त्याचा किंवा तिचा स्वभाव, रुप वा शील पाहण्याची संधी वधुवरास न मिळाल्यामुळे भिन्नरुची व भिन्न वागणुकीमुळे संसार दुःखकारक होतो तो होतोच. शिवाय त्यात संसाराची गोणी सुखानें वाहून नेण्यास धनसंचय करण्यास अवश्य असें उपयुक्त ज्ञान अथवा कला प्राप्त होण्यापूर्वीच त्याच्या पाठीवर ठेवली जात असल्यानें वाढता पसारा आणि घटता आधार अशी स्थिती येऊन ठेपतें व सारे जीणे व्यर्थ होतें. या विवाहपद्धतीनें व्यक्तीच्या जन्माचे मातेरे होत आहे. इतकेच नाहीं तर या पद्धतिपासून समाजावर अत्यंत अनिष्ट परिणाम होत आहेत. ज्याप्रमाणे जोरदार वृक्ष व्हावयाचा असल्यास त्याचा अंकूर जोरदार असावा लागतो, त्या प्रमाणे देशांत सुदृढ संतती निपजण्यास प्रजोत्पन्नकालीं स्त्री-पुरुषाची वाढ संपूर्ण झाली असली पाहिजे. दहा-बारा वर्षांच्या बालकांचे लग्न करून त्यांच्या कडून ज्या देशात प्रजोत्पादन करण्यात येतें त्या देशातील प्रजा खुरटी, अल्पायुषी, निस्तेज, निर्बल व निरुत्साही झाली नाही तर कशी होणार ? या देशांत शोधकबुद्धीचे लोक उत्पन्न झाले नाहीत याचे तरी SRI ही अनिष्ट विवाह पद्धतच होय. जेथें शरीर सामर्थ्याचा लोप होतो तेथें मानसिक सामर्थ्याचा लोप झाला तर त्यात नवल तें काय ? म्हणच आहे कीं शरीर धड तर मन धड.