हिंदुंचे धर्मशास्त्र, त्याचे क्षेत्र आणि त्याचे अधिकारी - Page 432

३८८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

समाजशास्त्रवेत्ते सांगत आहेत कीं जातीभेदामुळें हिंदुसमाजाची स्थिती खिळखिळी झाली आहे. जातीत जनन जातीत मरण, जातीत जेवण जातीत . लग्न, अशी हिंदुसमाजाची रचना असल्या कारणानें जितके म्हणून सार्वजनिक काम तें सर्व जातीबाह्य असल्या कारणानें निषिद्ध मानलें जातें. मनुष्य जितका लोकापासून वेगळा राहील तितकी त्याची जात शुद्ध राहते. जो घरची गाडी सोडून रेल्वेतून प्रवास करणार नाहीं, देश सोडून परदेशांत जाणार नाहीं, जो चोरट्यासारखा सर्व लोकांपासून वेगळा राहील तो मोठा जातीनीष्ट व जो बिळांतील उंदराप्रमाणे निरुपयोगी न राहतां सामाजिक जिवनात कोणताहि भेदभाव न करतांना भाग घेईल तो जातीभ्रष्ट मानला जातो. सार्वजनिक ऋणानुबंधाच्या गांठी पडून समाजाचे एकीकरण होण्यास जातिभेद ही मोठीच कातर आहे. एकीची भावना जातिभेद उत्पन्न होऊं देत नाहींच पण त्यापासून हिंदुमात्राचे जीवन भयंकर जातिमय बनते. एका जातीला दुसरी जात परकी वाटते व तिच्याशी व्यवहार करताना आपल्या जातीचा फायदा व पर जातीचे नुकसान हें धोरण मग तें कितीही अन्यायकारक असो, पाळण्यात येतें. यामुळे परस्पर हिंदु जातींत एकमेकांबद्दल इतका गैर विश्वास प्रस्थापित झाला आहे कीं परदेशीय राजा असला तर लोक संतुष्ट असतात. पण तोच स्वदेशी नेमण्यास कोणीच कबूल होऊ शकत नाहीं. कारण राजा स्वदेशीय असला तर त्याला कोणती तरी जात असावयाचीच, इतर जातींना तो परका व अविश्वसनीय वाटावयाचाच. याच भावनेपायी चांगल्या पुढाऱ्याचे पुढारीपण केवळ तो अमक्या जातीचा आहे एवढ्याच कारणामुळे इतर जातींना मान्य होत नाहीं. ज्या त्या जातीला आपल्या जातीचा पुढारी असावा असें वाटतें. पर जातीच्या शहाण्या पुढाऱ्याच्या मागें जाण्यापेक्षा स्वजातीतील पुढारी मग तो वेडगळ असेना त्याच्या मागे जाणे त्यांना बरे वाटते. जातीजातीतील लाथाडीमुळे पुढाऱ्यात लाथाडी माजते व तेणे करून कोणत्याहि महत्‌ प्रसंगी एकजूट होत नाहीं. स्वराज्याविषयीं जर कोणाला इतकी तळमळ वाटत नाहीं याचें कारण तरी हा जातिभेदच आहे. दरेक जातीला वाटतें कीं स्वराज्य आलें तर न जाणो दुसऱ्याच एका जातीच्या हातीं सत्ता जाईल व तसें झालें तर आपला घात होईल. तेव्हां परक्यांच्या हातात सत्ता आहे हें ठीक आहे अशी भावना होते. जातिभेदामुळें जातिद्वेषाला वाव मिळतो इतकेंच नव्हें तर तो जातिद्वेष वंशपरंपरा चालत जात असतो. इंग्लंडमध्यें अंग्ल, पीक्ट, स्याकसन्‌, केल्ट वगैरे निरनिराळ्या वंशाचे लोक होते. त्यांच्यामध्यें तुंबळ रणें माजली. त्यांचें वंशज हल्लीं त्याच देशांत आहेत. पण ते पूर्वजांची भांडणे भांडत असल्याचें कोणास ऐकू येत नाहीं. इंग्लंडमध्यें वॉरस्‌ ऑफ रोझेस या नांवाने प्रसिद्ध असलेल्या लढाईत