हिंदुंचे धर्मशास्त्र, त्याचे क्षेत्र आणि त्याचे अधिकारी - Page 434

३९० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

उरत नाहीं तशी स्थिती हिंदुसमाजाची न व्हावी व हा सारा अनर्थ टाळावा असें जर वाटत असेल तर जातीभेदाचे उच्चाटण करणे अत्यंत अवश्य आहे.

समाजशास्त्रवेत्ते असें सांगत आहेत की स्त्री व शुद्रांना कनिष्ठ लेखणे समाजास अकल्याणकारक आहे. ज्यांचा दर्जा खालचा असतो त्याला आपल्या कनिष्ठ पणाची आंच लागू लागली म्हणजे ते त्या विरुद्ध बंड करण्यास सिद्ध होतात व त्यामुळे समाजाची स्थिरता नष्ट होते. तथापि कनिष्ठ मानलेली माणसें आपल्यावर श्रेष्ठत्व मिरविणाऱ्या विरूद्ध बंडाळी करण्याचे धैर्य दाखवीतील तरी ती मोठी अभिनंदनीय गोष्ट मानली पाहिजे. पण तसें घडत नाहीं हा या भावनेचा मोठाच दुष्परिणाम आहे. कनिष्ठ माणसें अनेक दिवसाच्या कनिष्ठ भावनेच्या शिकवणीमुळे स्वतःच कनिष्ठ आहोंत असें मानावयास लागून श्रेष्ठाचे श्रेष्ठत्व व कनिष्ठाचे कनिष्ठत्व हें कृत्रीम कारस्थान नसून दैवाचा ठेवा आहे असे मानावयास लागतात व ज्या अन्यायाविरुद्ध बंड करणें त्याचे कर्तव्य असते त्याच अन्यायाला आपले नशीब म्हणून ते खुशीनें मान देतात. इतकेच नव्हे तर ज्यांच्या वर्चस्वाला ते आपली मान वाकवितात त्यांना लोकपाल, Yea, राजाधिराज, अशा विशेषणानें संबोधून त्यांची प्रशंसा करूं लागतात. या पासून दोन्ही वर्गाचा नेतिक अधःपात होतो. कनिष्ठांच्या अंतःकरणात श्रेष्ठ वर्गाच्या पूज्य बुद्धीचे पिढ्यानपिढ्याच्या संगोपनानें तिची पाळें मुळें इतकी खोल जातात कीं, कालांतराने ज्यांना एकदां पूज्य मानण्याची मनाला सवय झाली, ते त्या आदरांस पात्र नसले तरी त्याचा अपमान किंवा धिक्कार करणें तर राहोच पण त्यांना सर्वासारखें लेखण्याचे देखील धैर्य त्यांना होत नाहीं. ते सांगतील ते ऐकण्याची, वागवतील तसें वागण्याची आणि नेतील तिकडे जाण्याची त्यांना सवय लागते. अशा रितीनें जे एकवार परवश झाले त्यांना ती स्थिती बरी वाटूं लागते. उलटपक्षी श्रेष्ठ लोकांची स्तुती होत गेल्यामुळें त्या स्तुतीस आपण सर्वस्वी पात्र आहोत अशी त्यांची भावना होते व कालांतरानें ती भावना अंगात मुरली म्हणजे आपण परमपूज्य आहोत असें स्वतःचे ठाम मत करून घेतात आणि लोकांनी आपण होऊन मान दिला नाहीं तर त्यांना दंडून त्यांच्या कडून तो घेण्याचा ते प्रयत्न करितात. अशा प्रकारच्या वातावरणात वाढल्यामुळे श्रेष्ठलोक डौली व खुनशी बनतात व कनिष्ठ लोक नीच व भेकड होतात. ब्राह्मणांची वागणूक आणि ब्राह्मणेतरांची अस्पृश्यांशी वागणूक कशी असते याचा विचार केला म्हणजे या श्रेष्ठ कनिष्ठ भावामुळें परस्पर वर्गाच्या नीतिमत्तेवर अनिष्ठ परिणाम होऊन वरच्यांचे शील कसें बिघडते व खालच्यांचे तेज कसें नाहीसें होते याची सत्यता सर्वाना पटेल. शिवाय या श्रेष्ठ कनिष्ठ भावनेचा आणखी असा दुष्परिणाम होतो कीं कनिष्ठ पदाचा शिक्का ज्यांच्यावर