हिंदुंचे धर्मशास्त्र, त्याचे क्षेत्र आणि त्याचे अधिकारी - Page 436

३९२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

केलेले अन्न त्यांना चालते !! मुसलमान, खिश्चन इत्यादी धर्मातील लोक हिंदुधर्मातील कोणत्याही अतिशुद्र वर्गापेक्षा विशेष अस्पृश्य मानणें भाग आहे. कारण कोणताहि अतिशुद्र हिंदु गोवधाचे पाप करीत नाहीं. तथापि हिंदुंच्या घरी दारी मुसलमान किंवा खिश्चन चालतो ! इतकेच नव्हे तर त्यांच्याशी सहपान देखील खपते !! पण अस्पृश्यांची सावली देखील चालत नाहीं. स्पृशांच्या या वागणूकीत धर्म नाहीं, संयुक्तिकताही नाहीं. ही वागणूक म्हणजे शुद्ध मानवद्रोह आहे. या मानवद्रोहाच्या पापाचे प्रायश्चित या अतिशुद्रांनी हिंदुंना पूर्णपणें भोगावयास लावले आहे. हिंदुपदपादशाहीचा लोप होऊन मोंगलशाही कशी आली आणि मराठशाहीचा नायनाट होऊन ब्रिटीशशाही कशी प्रस्थापित झाली याची कारणे अनेक विद्वान लोक आपआपल्या परीनें देत आहेत. पण ती सारी खुळचट आहेत. परकीयांनी या देशात जी आपली सत्ता प्रस्थापित केली ती त्यांनी निव्वळ सैन्याच्या बळावर केली. या राजकीय क्रांत्या झाल्या त्यात या परकीय लोकांनी सैन्य कोठून आणले हा महत्वाचा प्रश्‍न आहे. हिंदुस्थानच्या इतिहासात एखादी विलक्षण अशी गोष्ट घडली असेल तर ती ही की त्यांनी हा जो देश काबीज केला तो या देशांतील लोकांचे सैन्य उभारूनच केला. एक पाऊल पुढे जाऊन या देशाचे स्वातंत्र्य हरण करण्याकरितां परकीयांनी उभारलेल्या सैन्यात कोण लोक सामील झाले असा एक प्रश्‍न विचारला तर अस्पृश्यतेनें या देशास कसें धुळीस मिळविले आहे हें उघड होईल. कारण परकीयांना साह्य करून त्याचे राज्य या देशावर प्रस्थापित करण्यात जर कोणत्या वर्गाने पुढाकार घेतला असेल तर तो अस्पृश्य वर्गच होय. त्याच्या सहाय्याशिवाय महाराष्ट्रात तरी मोगलीसत्ता टिकली नसती व इंग्रजी सत्ता सुरू झाली नसती किंवा स्थिरावली नसती. अस्पृश्यांनी देश द्रोह केला ही गोष्ट वाईट झाली असेल. पण त्याचे पातक ज्यांनी मानव द्रोह केला त्यांच्यावर आहे. या मानव द्रोहाची परंपरा नष्ट झाल्याशिवाय देश द्रोहाची परंपरा नष्ट होणार नाही.

या सुविचारांचा परिणाम कांहीं ब्राह्मणमंडळींवर होऊन त्यांनीं गत साली अकोला येथें जी ब्राह्मण परिषद भरविली होती त्या परिषदेंत वरील प्रश्नांवर प्रगतिपर असें कांहीं ठराव पास केलें. त्यापैकीं जे दोन महत्वाचे होते ते असें कीं, हिंदुतील कोणतीही जात सामाजिक अगर धार्मिकदृष्टीनें जन्मानें श्रेष्ठ वा कनिष्ठ नाहीं व सर्व वेदांचा अभ्यास करण्याचा मनुष्यमात्रास अधिकार आहे. हे दोन्ही ठराव म्हणण्यासारखे क्रांतिकारक आहेत असें कोणालाहि म्हणता येणार नाही. या अकोला परिषदेनें जातीभेद आपणास अमान्य आहे असें कांहीं म्हटलें नाहीं. फक्त जातीजातींत जी असमानता मानण्यात येते ती आपणास कबूल