हिंदुंचे धर्मशास्त्र, त्याचे क्षेत्र आणि त्याचे अधिकारी - Page 438

३९४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

येंऊ शकणार नाहीं. हिंदु समाज हा अनेक वर्षे जगला आहे तो केवळ गुलामांचे राष्ट्र म्हणून जगला आहे. त्या जगण्यात कीर्ति व प्रौढी आहे असें ज्यांना वाटत असेल त्यांनीं ती पाहिजे तर गावी. आम्हाला तरीं त्या जगण्याची अत्यंत लाज वाटते. नव्हे, आम्ही जगलो हें म्हणणे मुळांतच निराधार आहे असें आम्हास वाटते. आम्हीं जगलों असें म्हणण्यापेक्षा आमच्या जेत्यांनी आम्हास जगविलें म्हणून आम्हीं राहिलों हेंच म्हणणें आम्हास खरें वाटतें. अत्यंत प्राचीन काळीं जेते लोक ज्यांना ते जिकीत असत त्यांना ठार मारीत असत कारण जिंकलेल्या लोकांपासून त्यांच्या संपत्तीचा अपहार करण्यापलिकडे त्यांचा अन्य कामीं उपयोग करून घेण्याची अक्कल vid लोकांत नव्हती. परंतु जेंव्हा जेते लोक शहाणे झाले व जीत लोकांना मारुन टाकण्यांपेक्षां शेतकी वगैरे कामाकडे उपयोग करून घेतां येईल असें त्यास दिसून आले तेव्हां जीत लोकांचा संहार करण्याची पद्धत नाहींशी होऊन त्यांना गुलाम करण्याची पद्धत अंमलांत आली. हिंदु राष्ट्र जगलें यात त्याचा पराक्रम नसून ज्या लोकांनीं त्यांना जिंकले त्यांचा शहाणपणा आहे. ज्यांचीं परचक्रें हिंदुस्थानावर आली ते लोक अडाणी दशेंत जर असते तर हिंदुंचा संहार कधींच झाला असता. गुलामाचे राष्ट्र म्हणून मिरविण्याची दुर्दशा जी त्यांना साध्य झाली आहे ती देखील त्यांना लाभली नसती. याप्रमाणे जगण्याच्या अनेक परीनें पाहतां आम्हीं जगलों ही गोष्ट आम्हास भूषणावह तर नाहींच पण आम्ही जगलो याचे कारण आम्ही शास्त्राप्रमाणे वागलों हें नसून आम्हास आमच्या शत्रूंनी ठार मारले नाहीं हेंच होय. शास्त्राप्रमाणे वागून जर कांहीं झालें असले तर ते हेच कीं इतर राष्ट्रांपेक्षा आम्ही जास्त हतबल झालों व कोणाविरूद्ध दोन हात करून जय संपादन करण्याइतकी कुवत आमच्यांत राहीली नाहीं. एका राष्ट्राचा दुसऱया राष्ट्रापुढें टिकाव लागला नाहीं याची अनेक कारणें असली तरी सर्वात मुख्य कारण एकाची समाजघटना दुसऱ्याच्या समाजघटनेपेक्षा अधिक लवचिक व न्यायी हेंच होय. त्याशिवाय एका राष्ट्राचे वर्चस्व दुसऱ्या राष्ट्रावर फार दिवस टिकू शकत नाही. हा सिद्धांत जर खरा असेल आणि त्याला कांहीं प्रत्यवाय आहे असें आम्हास तरी वाटत नाहीं तर हिंदु राष्ट्राच्या आपेशपरंपरेचे कारण त्याची विपरीत घटना आहे हें निर्विवाद आहे. आणि ज्याअर्थी त्यांची घटना धर्मशास्त्रानुरूप आहे त्याअर्थी हिंदु राष्ट्राचा अधःपात त्यांच्या धर्मशास्त्रामुळें झाला आहे हे ओघानेच ठरते. ज्या सनातनी लोकांनी हे निर्णय दिले त्यांनी निर्णय देताना जग कोठे गेलें आहे व कोठें राहिलों आहोंत याचा मुळींच विचार केलेला असावा असें दिसत नाहीं. डोळे उघडून पाहिलें असतां सामाजिक सुधारणेच्या बाबतींत दुनिया कोठेच्या कोठे निघून गेली आहे. आम्ही मात्र जगाच्या आरंभी होतों तेथेंच आहोंत. तनानें, मनानें, धनानें