हिंदुंचे धर्मशास्त्र, त्याचे क्षेत्र आणि त्याचे अधिकारी - Page 440

३९६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

चालला असता तर भागले असतें काय? या सनातनी व समसमानी ब्राह्मणांच्या लढ्यांत आमचा ओढा समसमानी ब्राह्मणांकडे आहे हें सांगावयास नको. या लढ्यांत त्यांनी नव्या मताचा पुरस्कार केला याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करीतों. तथापि आम्हांस मोठ्या कष्टाने म्हणावे लागतें कीं समसमानी ब्राह्मणांच्या युक्तिवादानें कार्यभाग होणे शक्‍य नाही. समाजसुधारणेचे कार्य सुकर करावयाचे असेल तर दोन मुख्य प्रश्‍नांचा उलगडा झाला पाहिजे. सामाजिक प्रश्नांचा विचार करावयाचा तो धर्मशास्त्राच्या अनुज्ञेप्रमाणें करावयाचा किंवा समाजशास्त्राच्या सिद्धांताच्या आधारें करावयाचा हा त्या दोहोंपैकी एक प्रश्‍न आहे. दुसरा महत्वाचा प्रश्‍न हा कीं समाजाला लागू पडणारे धर्मशास्त्राचे निर्णय ब्राह्मण वर्गाने द्यावेत आणि बाकीच्यानीं ते मानावेत ही शिस्त हितकारक आहे काय? हे दोन्ही प्रश्‍न आमच्या मतें अत्यंत महत्वाचे आहेत. त्यांकडे समसमानी ब्राह्मणांचे लक्ष वेधलेलें मुळीच दिसून येत नाही. इतकेच नव्हे तर या प्रश्नाच्या बाबतींत त्यांच्यांत व सनातनी ब्राह्मणांत मतभेद आहे असें मुळीच दिसत नाहीं. दोघांनुहि सामाजिक प्रश्‍नाचा विचार धर्मशास्त्राच्या आधारें करण्यांत यांवा हें तत्व मान्य आहे. भेद इतकाच कीं, एकाला सर्व शास्त्रे व दुसऱ्याला त्यापैकीं फक्त कांहींच प्रमाणभूत वाटतात. दोघेही धर्मशास्त्राचा निर्णय देण्याचा अधिकार ब्राह्मणांचाच आहे असें मानून वर्तत आहेत. आमच्या मतें हीं दोन्ही तत्वे अतिशय घातुक आहेत. समसमानी ब्राह्मण नवमतवादी आहेत. हे जरी खरे असलें तरी असल्या नवमतवाल्यांच्या नादीं लागून हिंदुसमाजाच्या बुद्धीला धर्मशास्त्रांनी व धर्माधिकाऱ्यांनी लावलेलें ग्रहण सुटणार नाहीं. मताच्या नुसत्या नवेपणावर भाळून जाण्यांत अर्थ नाहीं. त्या मताचा आधार कोणता, धर्मशास्त्र कीं समाजशास्त्र, हें तपासणें अत्यंत अवश्य आहे. त्याशिवाय हिंदुसमाज बाहेरून कितीही सजलेला दिसला तरी तो आतून पोखरलेल्या खांबाप्रमाणे किडकाच राहणार आहे. यासाठीं धर्मशास्त्राचे क्षेत्र आणि धर्मज्ञाचे अधिकार निश्चित झालें पाहिजे. ते कसे करतां येईल याची चर्चा पुढे केंव्हा तरीं करूं,

आज या विषयाला झाली इतकी प्रस्तावना पुरे.

अग्रलेख : बहिष्कृत भारत, ता. २१ डिसेंबर १९२८.