८७
त्यांच्या माणुसकीचा खून होणार नाही,
तसले स्वराज्य त्यास हवे
१. नुकतीच पुणें येथें मुंबई प्रांतिक युवक परिषद भरली होती. या परिषदेचे अध्यक्ष हिंदी तरुणांचे पुढारी पंडीत जवाहरलाल नेहरू हे होते. मागें पुण्यास महाराष्ट्र प्रांतिक परिषद भरली होती तिला तरुणांचे दुसरे पुढारी बाबू सुभाषचंद्र बोस हें अध्यक्ष म्हणून लाभले होते. असें असुनही ती परिषद प्रतिगामी स्वरुपाची झाली. तिच्यांत अस्पृश्यता निवारणासारख्या सामाजिक व राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या ठरावास, धर्म आणि राजकारण यांच्या विभक्तीकरणाच्या सबबीखाली गंचांडी मिळाली. तरुणांचे तडफदार म्होरके
आणि क्रांतीवादी सुभाषबाबू पुण्यांच्या विषारी वातावरणास व ब्राह्मण्यग्रस्त
पुढाऱ्यांच्या कुटिल कारस्थानास बळी पडले. तसलाच कांहीं प्रकार या तरुण परिषदेंत होतो की काय अशी भीती आम्हांस होती. परंतु त्यांतल्यात्यांत पं. जवाहरलालसारखा बाणेदार, कळकळीचा, चौकस, व कसल्याही प्रकारच्या लपंडावाच्या आहारी न पडण्यासारखा अध्यक्ष या युवक परिषदेस लाभला असल्यामुळे आम्हास आशा होती. ती आशा विशेष जरी फलद्रूप झाली नसली तरी अगदींच विफल झालीं असें मात्र दिसून आले नाहीं. स्वागताध्यक्षांच्या आणि अध्यक्षांच्या, दोघांच्याही भाषणांत सामाजिक विषयावर थोडी कां होईना पण चर्चा दिसून येते. स्वागताध्यक्ष रा. गाडगीळ यांनीं आपल्या भाषणांत सांगितले की. “ युवकांच्या चळवळीस सामाजिक समतेचे तत्त्व मान्य आहे; राष्ट्राची प्रकृती त्यांत प्रचलित असलेल्या सामाजिक चालीरीतीवरूनच ठरविली जाते; जर उदार शिक्षणानें एवढेही आम्हास पटलें नाहीं की केवळ एखाद्या जातींत जन्मल्यामुळेच हक्क व अधिकार मिळत नाही, ते जन्मजातीवर अवलंबून आहेत तर आपल्या कपाळीं राजकीय गुलामगिरीच असणे सर्वथैव योग्य होय; माझे असें प्रामाणिक मत आहे कीं अस्पृश्यता ही शास्त्र सम्मत देखील नाही, वगैरे वगैरे. जवाहरलाल यांनी देखील आपल्या तडफदार भाषणांत, सामाजिक व धार्मिक क्षेत्रांत धुमाकुळ घालीत असलेल्या अरेरावी विरूद्ध तरुणांनी बंड पुकारावयास पाहिजे असें सांगीतले. ते पुढें म्हणाले कीं, प्राचीन काळी धर्माचा उपयोग स्वातंत्रेच्छा मारण्यासाठी अफू प्रमाणें करण्यांत आला. राजेलोकांनी त्याचा