मनोगत - Page 45

मनोगत

जर या हिंदुस्थान देशातील सृष्ट पदार्थांच्या व मानवजातीच्या चित्रपटाकडे प्रेक्षक या नात्याने पाहिले तर, हा देश म्हणजे केवळ विषमतेचे माहेरघर आहे ; असे निःसंशय दिसेल. येथील सृष्टिपदार्थांची उपयुक्तता व विपुलता ; व त्याशी संलग्न असलेल्या अफाट जनसमूहात वसत असलेल्या दारिद्र्याची विषमता इतकी मनोवेधक आहे की, तिच्याकडे असावधपणातदेखील लक्ष गेल्याशिवाय रहाणार नाही. परंतु या विषमतेकडे लक्ष जाते न जाते तोच, या देशात वास्तव्य करणाऱ्या मानवांत नांदत असलेली, व उपरिनिर्दिष्ट धाकट्या बहिणीस लाजणारी ही थोरली विषमता दत्त म्हणून डोळ्यापुढे लख्ख उभी रहाते.

या हिंदी जनांत वसणारी विषमता अनेक स्वरूपाची आहे. सर्वसाधारण असलेली कायिक, व मानवकोटीच्या आद्य शाखाअन्वये उद्भवलेली विषमता येथेही आहेच. काळे-गोरे, उंच-ठेंगणे, नाकेले किंवा फेंदारलेले तसेच आर्य-अनार्य, गोंड-खोंड, यावनी-द्रविड, अरब व इराणी इत्यादी भेद काही ठिकाणी जागृत, तर काही ठिकाणी शमित ; व काही ठिकाणी स्थित पण आहेतच. धार्मिक विषमता कायिक व मानवकोटीच्या शाखाअन्वये येणाऱ्या विषमतेपेक्षा प्रज्वलित स्थितीत आहे व केव्हां केव्हां तर ही धार्मिक विषमता विकोपास जाऊन तिच्या पायीं रक्तपातसुद्धा होतो. हिंदु, पारसी, यहुदी, मुसलमान, खिस्ती वगैरे धार्मिक विषमतेचे तट तर आहेतच ; पण अधिक बारीक दृष्टीने पाहिल्यास हिंदुधर्मीयांत शिरलेल्या विषमतेचे स्वरुप जितके कल्पनातीत, तितकेच ते निदास्पदही आहे.

हा मांग-हा ब्राह्मण, हा शेणवी-हा मराठा, हा महार-हा चांभार, हा कायस्थ-हा पार्शी, हा कोरी-हा वैश्य, इत्यादी भिन्न भिन्न जातींचा हिंदुधर्माच्या पोकळीत समावेश होतो. एकधर्मीयत्वाच्या भावनेपेक्षा भिन्न जातीयत्वभावनेच्या मुळ्या किती खोल गेल्या आहेत हे हिंदूंना सांगणे नकोच. एखाद्या युरोपीय गृहस्थाने

आपण कोण ? या प्रश्‍नास इंग्लिश, जर्मन, फ्रेंच, इटालियन इत्यादीप्रकारचे

उत्तर दिलें की समाधान होते. परंतु हिंदूंची मात्र तशी स्थिती नाही. मी हिंदू आहे या उत्तराने कुणाची तृप्ती व्हावयाची नाही. त्याला आपली जात काय ? हें सांगणें अगदी जरूर असते. म्हणजे आपली विवक्षित माणुसकी व्यक्त करण्यासाठी प्रत्येक हिंदूला आपली विषमता पदोपदी उघडकीस आणावी लागत आहे.

डब्ल्यू-२०७३-१ अ