मनोगत - Page 46

२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

हिंदुधर्मीयांत असलेली ही विषमता जितकी अनुपम आहे, तितकीच ती निंदास्पदही आहे. कारण विषमतेनुरूप होणाऱ्या व्यवहाराचे स्वरूप हिंदुधर्माच्या शीलाला शोभण्यासारखे खास नाही. हिंदुधर्मात समाविष्ट होणाऱ्या जाती उच्च-नीच भावनेने प्रेरित झाल्या आहेत हे उघड आहे. हिंदुसमाज हा एक मनोरा आहे. व एक एक जात म्हणजे त्याचा एक एक मजलाच होय. पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की, या मनोऱ्यास शिडी नाही. आणि म्हणून एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यास मार्ग नाही. ज्या मजल्यात ज्यांनी जन्मावे ; त्याच मजल्यात त्यांनी मरावे. खालच्या मजल्यातला इसम, मग तो कितीही लायक असो; त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही. व वरच्या मजल्यातला माणूस, मग तो कितीही नालायक असो ; त्याला खालच्या मजल्यात लोटून देण्याची कोणाची प्राज्ञा नाही.

उघड भाषेत बोलावयाचे म्हणजे जाती-जातीत असलेल्या या उच्च-नीच भावना, गुणावगुणांच्या पायावर झाल्या आहेत ; असे नाही. उच्च जातीत जन्मलेला, मग तो कितीही अवगुणी असो; तो उच्च म्हणावयाचा. तसेच, नीच जातीत जन्मलेला, मग तो कितीही गुणी असो ; तो नीचच रहावयाचा. दुसरे असे की, परस्परांत रोटी-बेटी व्यवहार होत नसल्यामुळे दरएक जात या जिव्हाळ्याच्या संबंधात स्वयंवह म्हणजे तुटक आहे. ही निकटसंबंधाची गोष्ट जरी बाजूस टाकली तरी परस्परांतील बाह्य व्यवहार अनियंत्रित असा नाही. काहींचा व्यवहार दारापर्यंत होतो व कांही जाती तर अस्पृश्य आहेत. म्हणजे, त्या जातीतील माणसाचा स्पर्श झाला असता इतर जातीतील माणसांस विटाळ होतो. विटाळामुळे या बहिष्कृत जातींशी इतर जातींच्या लोकांचा क्वचितच व्यवहार होतो. रोटी-बेटी व्यवहाराच्या अभावी कायम झालेल्या परकेपणात स्पृश्यास्पृश्य भावनेने इतकी भर टाकलेली आहे की, या जाती हिंदुसमाजात असून समाजाबाहेर आहेत असेच म्हटले पाहिजे.

या व्यवस्थेमुळे हिंदुधर्मीय ब्राह्मण, ब्राह्मणेतर व बहिष्कृत असे तीन वर्ग होतात. तसेच या विषमतेच्या परिणामाकडे लक्ष दिले तर असें दिसून येईल की, तिच्या पायी विविध जातीवर विविध परिणाम झाले आहेत. सर्वात उच्च असलेल्या ब्राह्मणवर्गास आपण भूदेव आहोंत असे वाटत आहे. सर्व मानवांचा जन्म आपल्या सेवेसाठी आहे असे मानणाऱ्या भूदेवांना रूढ असलेली विषमता पोषकच आहे. आणि म्हणूनच ते आपल्या स्वनिर्मित हक्काने आपली सेवा करून घेऊन आपण राजरोसपणे व बिनदिक्कत मेवा खात आहेत. त्यांनी काही करणी केली आडे म्हणावे तर ज्ञानसंचय व धर्मशास्त्रलेखन एवढेच काय ते! पणते धर्मशास्त्र म्हणजे आचार-विचाराच्या प्रबल विरोधाचे कोडेच म्हणावयाचे.

डब्ल्यू-२०७३-१ ब