सत्यशोधक समाज - Page 451

सत्यशोधक समाज ४०५

माझ्याने राहवत नाही, ते गृहस्थ म्हणजे कै. गोपाळबुवा वलंगकर हे होत. त्यांनी आपल्या लेखनाद्वारे जी जागृती केली ती अनुपम आहे. ज्यांना ती पाहावयाची असेल त्यांनी दीनबंधूच्या जुन्या फाईली वाचून पाहव्यात म्हणजे कळेल. “ (बहिष्कृत भारत, ता. ३ एप्रिल १९२७.)

म. फुले नंतर छत्रपती शाहू महाराज यांनी ११ जानेवारी १९११ रोजी कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची पुनर्स्थापना केली, त्यांनी म. फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या ध्येय, उद्देश आणि त्यांचे प्रदर्शित विचार यांना दृष्टिगत या चळवळीला अधिक व्यापक स्वरूप दिले होते. या चळवळीमुळे आपले अस्तित्व धोक्यात येत आहे असे समजून ब्राह्मण समाजाने पंढरपूर येथे तारीख १७ ते १९ सप्टेंबर १९२० मध्ये ' पहिली ब्राह्मण्य संरक्षक परिषद भरविली.' त्यातील ठरावानुसार वि. शि. जोग वकिल यांना कोल्हापूर व सातारा भागात बहुजन समाजाकडून ब्राह्मण समाजावर झालेल्या अन्याय, अत्याचारांची चौकशी करण्यास नेमण्यात आले.

परिषदेच्या अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे की, “ सनातन धर्मीय उर्फ पुराणमताभिमानी हिंदुंच्या विरूद्ध चळवळ करणारा जसा सत्यशोधक समाज आहे तसे प्रार्थना, ब्रह्मो, आर्य, हिंदू मिशनरी सुधारक वगैरे अनेक आधुनिक समाज आहेत. परंतु प्रार्थना समाजादिकांच्या आणि सत्यशोधकाच्या कार्याची जर तुलना केली तर सत्यशोधक समाज अनत्याचारी प्रागतिक नसून अत्याचारी क्रांतीकारक आहे हे कळून येणार आहे."

““ सत्यशोधकी अत्याचाराकडे सरकार कानाडोळा करीत आहे. सरकारचे हे धोरण सरकारनीच पूर्वीपासून दिलेल्या अभिवचनाविरूद्ध आहे. सबब हे प्रकार ताबडतोब अजिबाद बंद करण्याची सरकारने तजवीज करावी."

हा संपूर्ण अहवाल ' सातारा जिल्हयातील सत्यशोधक समाजाच्या अनुयायांची पुंडाई, जबरदस्ती अत्याचार वगैरे” या शिर्षकाखाली ब्राह्मण संरक्षक संघ श्रीक्षेत्र पंढरपूर १९२१ द्वारे मुंबई सरकारला आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविला होता.