नगर येथील पाणी प्रकरण बाटलेले ख्रिस्ती व ब्राह्मण्यग्रस्त हिदु यांच्यामधील एका जुन्या वादाची हकीकत - Page 462

४१६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

पुढे नामदार लॉर्ड एल्फिन्स्टनसाहेब यांनी हे ठराव जास्ती कायम व्हावे म्हणून हें सर्व प्रकरण हिंदुस्तान संबंधी स्टेट सेक्रेटरी यांजकडे पाठवून दिलें. त्याचें मनन करून स्टेट सेक्रेटरी सर चार्लसवूड यांनी नंबर ३४ ता. ९ माहे ऑगस्ट सन १८६० इ. रोजी ठराव केला, आणि मुंबई सरकारकडे पाठविला, तो येणें

प्रमाणें :--

““ महाराज, नेटिव खिस्ती लोकांनी प्रसिद्ध कारंज्यांतून पाणी घेण्याची सुरूवात केली तेणें करून पाणी बाटले, अशी जी अहमदनगरच्या कितीक लोकांची फिर्याद होती तिजप्रकरणी आपण पाठविलेले कागदपत्र कौन्सिलांत मजपुढें ठेवले गेले. आमच्या AHA सरकारानें निकाल करावा, असें जे फिर्यादी यांचे मागणें होतें, तें अमान्य करून जो ठराव आपण केला तो मला पसंत आहे. मलिका माआजमः सरकारच्या ता. १८ नोव्हेंबर सन १८५८ च्या जाहीरनाम्याचा भलताच अर्थ करून फिर्यादी लोक त्यावर उड्या मारितात, ही त्यांची मोठी चूक आहे. नेटिव खिस्ती लोक प्रसिद्ध कारंज्यांतून पाणी घेऊं लागले असतां त्यांस उपद्रव देण्याचें जे यत्न फिर्यादि लोकांनी केलें, ते करण्यास त्या जाहीरनाम्यांत कांहीच आधार नाही. “

(सही) सी. वुड.

या प्रमाणें हें प्रकरण थेट विलायतेपर्यंत जाऊन त्याचा अखेर निकाल झाला, आणि हिंदु वगैरे लोकांमधून निघून जे लोक ख्रिस्ती झाले आहेत, त्यांस कायद्यावरून इतर लोकांबरोबर प्रसिद्ध हौद, तळी, बारवा इत्यादी पाणवठ्यावर पाणी भरण्याचा पूर्ण अधिकार आहे हें सिद्ध झालें. तरी नगरचे लोक बहुत दिवसपर्यंत आणखी अर्ज वगैरे प्रयत्न करीतच होते. त्याविषयी येथें लिहिण्याची कांही जरूर नाहीं. तरी हें सांगितले पाहिजे कीं, त्यांतून एकासुद्धां यत्नांत त्यांस यश आलें नाही ; उलटें कांही प्रयत्नांत त्यांची मोठी फजिती झाली. शेवटी त्यांचे सर्व उपाय खुंटले म्हणून ते चुप्प बसले. जे हौद टाकून दिले होते, त्यांतून कांही एकांचा उमासा केला, पण सर्वांचा नाही. मुसलमान लोक इतर हौदांचा त्याग करण्याच्या कामी मुळींच त्यांस अनुकूल झालें नाहीत. शुद्र हळुहळू पाणी भरुं लागले. आणि कांही दिवसांनी सर्व कारंज्यांवर पूर्वीच्याप्रमाणें झुंबड पडूं लागली. नंतर ब्राह्मणांनी अनेक शहरें व क्षेत्रे, येथील ब्रह्मवृंदास लिहून ख्रिस्ती! होऊन बाटलेले लोक ज्या हौदावर पाणी भरितात येथून ब्राह्मणांनी पाणी आणणें योग्य आहे किंवा नाही, याविषयी अभिप्राय विचारले, तिकडून अनुकूल उत्तरें आलीं कीं, प्रतिकूल हें सांगवत नाहीं. पण इतकें ठाऊक आहे की, ब्राह्मण व ब्राह्मणांच्या बायकाही लौकरच खिस्ती लोकांबरोबर पाणी भरूं लागल्या. पुढे नगर जिल्ह्यांत

डब्ल्यू-२०७३-२७ ब