४२६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
५ हजार पायदळ व २५ हजार घोडदळ होते. पेशव्यांच्या सैन्याने आपणाला खत्म केले तर कर्नल बरला ते खतूम करतील आणि हे पाहून मध्य हिंदुस्थानांतील शिंदे, होळकर व भोसले हे जनरल स्मिथला मोडून टाकतील, आणि यामुळे ब्रिटिश राज्याचा हिंदूस्थानातील पायाच उखडला जाईल, हे भविष्य इंग्रज लष्करी अधिकाऱ्यांना दिसत होते. म्हणून कॅप्टन स्टॉटन पेशव्यांच्या सैन्याचा कसा पाडाव करता येईल याचा व्यूह रचीत होता. त्याने पेशव्यांच्या सैन्याला हुलकावण्या देऊन कोरेगांव खेड्यांत प्रवेश केला. या गावाला मातीचे कुसू होते. हे कुसू आणि गावातील घरे यामुळे पेशव्यांच्या घोडदळाला गावात शिरून लढाई करणे कठीण होते, हे स्टाँटनने हेरून, गाव आपल्या ताब्यात घेतला, आणि भीमा नदीच्या किनाऱ्यावर आणि शिरूरला जाणाऱ्या रस्त्यावर, जेथून पेशव्यांच्या सैन्यावर अचूक मारा करता येईल अशा ठिकाणावर त्याने दोन तोफा डागल्या. गावाच्या मध्यभागी जी गढी होती तिच्यावर त्याने तोफ डागली नाही. त्यामुळे पेशव्यांचे सैन्य गावात शिरतांना त्यावर तोफेचे गोळे झाडून तो सैन्याचा ग्रामप्रवेश थांबवू शकला नाही. त्यामुळे गावातील चकमकीत त्याला आपले बरेचसे सैनिक गमवावे लागले. (कित्ता ५-६)
पेशव्यांच्या सैन्यांत अरब, गोसावी आणि मराठे यांचा भरणा होता. तेही चांगले लढवय्ये होते. त्यांच्या माऱ्यापुढे इंग्रज सैनिकांची अनेक वेळा कच खाल्ली. त्यांची झोप उडाली, तहानभूक हरपली आणि ते शत्रूला शरण जांऊ या म्हणून ओरडू लागले. लेफ्टनंट faster आणि इतर अधिकारी स्टाँटनला पुनः पुनः तेच सुचवू लागले. घनघोर युद्धांत तरुण अधिकारी लेफ्टनंट पॅटिन्सन आणि लेफ्टनंट चिशोल्म हे या लढाईत कामी आले. चिशोल्मच्या देहाचे शत्रूनी तुकडे तुकडे केले होते. त्याकडे लक्ष वेधवून, स्टॉटन आपल्या सैनिकांना सांगत होता की तुम्ही जर शत्रूला शरण गेलात तर तुमचा किती छळ करतील हे तुम्ही या तुकडे करण्यावरून लक्षांत घ्या व प्राणपणाने लढा ; मरण पत्करा पण शरण जाऊ नका. मग इंग्रज सैनिकांनी निकराचे हल्ले चढविले. आणि १ जानेवारी १८१८ ला रात्री ९ वाजता पेशव्यांच्या सैन्याने पळ काढला. इंग्रज सैनिकांनी त्यांचा पाठलाग केला तो भीमा नदीपर्यंत. नदीतील पाणी पिऊन त्यांनी आपली २५ तासांची तहान भागविली. पेशव्यांच्या सैन्याला पळ काढावयास लावणारी जी प्रमुख तुकडी होती ती सर्व महार सैनिकांची होती. त्यांनी आपल्या ४० पट संख्येने असलेल्या पेशव्यांच्या सैन्याला पळवून लावले. हे महारांचे शौर्य पाहून बाकीच्या पेशव्याच्या सैन्याचा धीर खचला व सर्वच सैन्य पळू लागले. इंग्रजांच्या एकंदर ८३४ (सैनिक व अधिकारी) लढवय्यापैकी २७५ लढवय्ये मेले अगर जखमी झाले. आणि पेशव्याचे सुमारे ६०० लोक कामास आले.