सहभोजनाचा मासला - Page 474

परिशिष्ट-१०
सहभोजनाचा मासला

ता. १६-४-२७ रोजी खंडू बोरीकर (मांग) मयत झाल्या कारणानें त्याचा १३ वा दिवस ता. २७-४-२७ रोजी रिपन रोड लोखंडी चाळ येथें साजरा करण्यांत आला. त्याच्या आप्तेष्टांनी गरिबीस अनुसरून ५०-६० मनुष्यांच्या भोजनाची सोय केली असून सदर प्रसंगीं त्या चाळीतील कांहीं महार बंधूसही जेवण्याचें आमंत्रण दिलें होते. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशीं कीं, ऐन वेळी महारबंधू जेवण्यास तयार होईनात. तरी पण रा. डी. बी. शिंदे व रा. आर. एच. आडांगळे हे दोनच सद्गृहस्थ जेवण्यास गेले व त्यांनी सर्व मातंगबंधू समवेत बंघुत्वाच्या नात्यानें सहभोजन केलें. परंतु तें जेवण घेऊन घरीं येतात न येतात तोंच चाळीतील कांहीं महार बंधूंनी आपल्या अकलेचे तारे तोडण्यास सुरवात केली. व त्यांना अनेक प्रकारच्या शिव्यांची लाखोली घालून जातींतून वाळीत टाकण्याची धमकी दिली. तरी त्या आमच्या महार बंधूंस आम्ही प्रेमपूर्वक असे विचारतों की, मराठ्यांच्या घरचे दोन दिवसाचे शिळें विटलेलें अन्न त्यांच्या पायां पडून मागून खायचे किंवा यदाकदाचित मराठ्यानें आमंत्रण दिलेंच तर लांब शेण मूत्राच्या उकिरड्यावर बसून कुत्र्यासारखें लांब फेकून दिलेल्या भाकरी खाणें त्यापेक्षां हें मानासन्मानानें जेवणें चांगलें नाही काय ? करितां आम्ही विनंति करितो की, ठिकठिकाणी अशीं सहभोजनें करून समाजोन्नतीचे श्रेय आपल्या पदरी पाडून

घ्यावें.

आपले नम्र महार बंधू

डी. बी. शिदे,

आर. एच. आडांगळे.

बहिष्कृत भारत, ता. ३ जून १९२७.