परिशिष्ट-१४
महारांवर अत्याचार
श्री. शिवराम गोपाळ जाधव, प्रचारक, बहिष्कृत हितकारिणी सभा, हे हल्लीं महाड तालुक्यांत उपदेश करीत फिरत आहेत. त्यांनी जें पत्र पाठविलें आहे त्याचा सारांश येणेंप्रमाणें :--(अ) मु. तुर्भे (बु.) येथील मराठे महार लोकांवर अत्याचार करण्याच्या धमक्या देतात कीं, मृतमांस Geet नाहीं, आम्हाला जोहार केला नाहीं, अगर आमच्या भाकरी मागितल्या नाहींत, तर तुमच्या डोकीवर मडकी देऊन तुम्हांला गावांतून हाकलून देऊ. महाड परिषदेपासून येथील महारांत स्वाभिमान उत्पन्न झालेला आहे. तो स्पृश्य टांचेखालीं रगडूं पहात आहेत. गावांत फिरू न देणें, दुकानांतील सामान विकत न देणें वगैरे उपायांनी स्पृश्य रहिवाशी महारांना त्रास देतात. याचप्रमाणें मु. पालें, मु. वडगांव, आसनपव येथें जुलूम होत असून महारांना शेतांतून रस्त्यांवरून जाऊं देत नाहींत. पांडुरंगदास देऊदास गोसावी (महार) याला ता. ४-६-२७ रोजी रावबाजी मराठ्यांनी बेदम मार दिला.
ठिकठिकाणी लहान मोठ्या प्रमाणांत महारांवर मराठ्यांचा जुलूम चालूं आहे. अस्पृश्यांना शाळा मोठ्या प्रमाणांत नाहींत.
सरकार वरील गोष्टींकडे लक्ष देईल काय ?
बहिष्कृत भारत, ता. १ जुलै १९२७.