परिशिष्ट-१६
बहिष्कृत भारतावरील अभिप्राय
(१) तरूण भारत-तारीख ४-४-२७
बहिष्कृत भारत :-संपादक-डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, बार-अँट-लॉ.,, परळ, मुंबई. महाराष्ट्रांतील अस्पृश्य बांधवाची सेवा करण्याकरितां हें पाक्षिक सुरू करण्यांत आलेलें असून सदर पाक्षिकाचे संपादक परदेशांत उच्च शिक्षण संपादन करून आलेले एक अस्पृश्य सद्गृहस्थ आहेत व हें विशेषच भूषणीय आहे. पत्राची भाषा सुबोध व सदभिरुचीला धरून असल्यानें व विचार राष्ट्रीय स्वरुपाचे असल्यांनें पाक्षिक बऱ्याच श्रेष्ठ दर्जाचे आहे. केवळ अस्पृश्यांच्या उन्नतीकरितां अशा एखाद्या भारदस्त नियतकालिकाची उणीव होतीच. ही उणीव हें पाक्षिक चांगल्या प्रकारें भरून काढील यांत शंका नाहीं. वा. व. ३ रुपये.
(२) प्रजापक्ष-तारीख २४-४-२७
बहिष्कृत भारत :-बॅ. आंबेडकरांच्या संपादकत्वाखाली सदर पाक्षिक रहीम बिल्डींग मुंबई येथें निघूं लागलें आहे. अस्पृश्य वर्गातर्फे झटणाऱ्या अशा एखाद्या स्वतंत्र पत्राची मोठी उणीव होती ती या पत्रानें भरून निघेल असें वाटतें. डॉ. आंबेडकर यांची लेखणी तडफदार असून तेजस्वी आहे. सत्यशोधकी तर्कटी वळणावर ती न जावो म्हणजे मिळविली. असो; आमच्या या नूतन बंधूचें आम्हीं मोठया प्रेमानें स्वागत करीत आहों. वार्षिक वर्गणी टपाल खर्चासह ३ रुपये.
(३) परीक्षक-तारीख २८-४-२७
बहिष्कृत भारत नांवाचें पाक्षिक वर्तमानपत्र नुकतेच निघूं लागलें असून त्याचे दोन अंक प्रसिद्ध झाले आहेत. पत्राचे संपादक बॅरिस्टर डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे स्वत: आहेत. इतके सांगितलें म्हणजे पत्राच्या योग्यतेबद्दल विशेष सांगण्याचे कारण नाहीं. बॅ. आंबेडकर हे चांगले विद्वान असून देशासंबंधीचे त्यांचे विचार फारच कळकळीचे आहेत. त्यांची भाषासरणी व विषयप्रतिपादन शैली वाचकांच्या मनावर परिणाम करणारी असते. युक्तिवाद सरळ, सडेतोड, व सभ्यतेचा अतिक्रम न होऊ देता करण्यांत येत असतो. अस्पृश्य मानलेल्या जातींना हिंदुसमाजांत समानता प्राप्त करून देऊन त्यांची उन्नती घडवून आणण्यास झटणें हा "बहिष्कृत भारत' पत्राचा प्रमुख उद्देश आहे. हें पत्र बहिष्कृत वर्गासच नव्हे, तर इतर वर्गासहि भूषणभूत होईल अशी आम्हांस आशा आहे. 'बहिष्कृत भारत' हें तूर्त पाक्षिक असलेलें पत्र लवकरच साप्ताहिक होवो
असें आम्ही इच्छितों.